अडीच वर्षीय हिमोफेलियाग्रस्त बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया
कोल्हापूर :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) उपचारासाठी दाखल झालेल्या अडिच वर्षीय बालकांवर हायपोस्पेडियास ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. सदर बालक हिमोफिलिया ‘ए’ या आजाराने ग्रस्त होता. शासकिय रूग्णालयात अशी दुर्मिळ शस्त्रकिया करण्याची पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हिमोफेलियाग्रस्त रूग्णावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे असते. त्यातच सदर अडीच वर्षीय बालक असल्यामुळे शस्त्रक्रिया करण्याची जोखीम अधिक होती.
पण हिमॅटोलॉजिस्ट डॉ. वरुण बाफना, डॉ. शिवप्रसाद हिरुगडे व त्यांच्या टीमने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने ही जोखीम पत्करली व गुंतागुतीची शस्त्रक्रिया यशस्वीही करून दाखविली. शस्त्रक्रियेसह महागडी औषधे मोफत देण्यात आली. यासाठी सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी सहकार्य केले.
सदर बालकास लघवीचा त्रास होत असल्याने सीपीआरमध्ये बालरोगशास्त्र विभागात उपचारासाठी दाखल केले होते. डॉ. बाफना यांनी बालकाची तपासणी केली असता त्याला हायपोस्पाडियास व रक्ताशी निगडित हिमोफिलिया ‘ए’ आजार असल्याचेही निदान झाले होते. इतक्या लहान वयातच हा आजार झाल्याने गंभीर स्थिती होती. मात्र, बालकाची शस्त्रक्रिया करणेही गरजेचे होते.
सीपीआरमधील बालरोगशास्त्र विभागातील तज्ञांनी सदर बालकावर सलग 14 दिवस देखरेख ठेवत योग्य औषधोपचाराने शस्त्रकिया यशस्वी करत आव्हान पेलले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला लघवीचा त्रासही कमी झाला. बालरोगशास्त्र विभागातील स्टाफनेही मोलाची कामगिरी बजावत बालकावर यशस्वी उपचार केले. बालकाच्या नातेवाईकांनीही उपचाराबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. वसंत देशमुख, डॉ. शिवप्रसाद हिरुगडे, डॉ. मधुर जोशी, डॉ. अनिता परितेकर, डॉ. विद्या पाटील, डॉ. वरुण बाफना, डॉ. आरती घोरपडे, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. भूषण मिरजे, अधीक्षक विभागाचे प्रमुख शशिकांत राऊळ, समाजसेवा अधीक्षक रोहित लोखंडे, नर्सिंग कर्मचारी यांच्यासह बालरोगशास्त्र विभागातील सर्व कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला.
जोखीम तरीही शस्त्रक्रिया यशस्वी
हिमोफेलिया रूग्णांमध्ये फॅक्टर 9 नावाचा घटक कमी असल्याने रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते. एखादी जखम जरी झाली तरी रक्तस्त्राव थांबत नाही. शस्त्रक्रियेवेळी रक्त थांबवणे फार जोखमीचे असते. सीपीआरमधील डॉक्टरांनी योग्य उपचाराने शस्त्रक्रिया यशस्वी केली.
डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता, सीपीआर
गुंतागुंतीच्या रूग्णांना उपचारासाठी दिशादर्शक
शस्त्रक्रियेसाठी नियोजन, अचूक फॅक्टर, व्यवस्थापन यासाठी डॉक्टरांचा समन्वय महत्वाचा ठरला. अर्धायुषी फॅक्टरच्या वापरामुळे उपचार प्रक्रिया सुलभ झाली. रक्तस्त्रावाचे नियंत्रणही राखता आले. हिमोफेलिया ए रूग्णावर शस्त्रक्रिया करण्याचे पहिलेच प्रकरण आहे. गुंतागुंतीच्या रूग्णावर उपचारासाठी दिशादर्शक ठरू शकते.
डॉ. वरूण बाफना, हिमॅटोलॉजिस्ट, सीपीआर