For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केएलई रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण यशस्वी

10:40 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
केएलई रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण यशस्वी
Advertisement

वडगाव येथील व्यक्तीकडून अवयव दान

Advertisement

बेळगाव : केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण वडगाव येथील मुकुंद राठा यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मेंदू निष्क्रीय झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांकडून अवयव दान करून एका रुग्णाला जीवदान दिले आहे. याबद्दल केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्याकडून सदर कुटुंबीयांचे कौतुक करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्रामध्ये यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत रुग्णालयात 12 यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांचा अधिक समावेश असून उर्वरित बेंगळूर, गुलबर्गा, हुबळी, हावेरी, हासन येथील रुग्णांचा समावेश आहे. अवयव दान करण्यासाठी उत्तर कर्नाटकात व्यापक प्रमाणात जागृती करण्यात आली आहे. यामुळेच अवयव दान करण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. त्यानुसार केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयामध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात येत आहेत. केएलई रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांकडून अवयव दान केल्यामुळे सहा यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. उर्वरित सहा शस्त्रक्रिया धारवाड एसडीएम रुग्णालय, हुबळी किम्स आणि सुचिरायु रुग्णालय येथे दाखल झालेल्या रुग्णांनी अवयव दान केल्याने यकृत प्रत्यारोपण करण्यात यश आले आहे.

यकृत प्रत्यारोपण करून घेण्यासाठी केएलई रुग्णालयात 30 पेक्षा अधिक रुग्ण प्रतीक्षेत आहेत. अवयव दान केल्याने अनेकांचा जीव वाचतो तर अनेक जणांना यामधून प्रेरणा मिळते. कोणत्याही रुग्णाला योग्य पद्धतीने उपचार मिळावा, सुपरस्पेशालिटी उपचार पद्धतीपासून वंचित राहू नये, तसेच माफक खर्चात उपचार उपलब्ध व्हावा, अशी सोय करण्यात आली आहे, असे डॉ. कोरे यांनी सांगितले. यकृत प्रत्यारोपण करण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित तज्ञ डॉक्टर, योग्य नियोजन, प्रत्यारोपणानंतर योग्य देखभाल, अशा सुविधा रुग्णालयात उपलब्ध आहेत. उत्तर कर्नाटक आणि गोवा राज्यासाठी केएलई हे एकमेव रुग्णालय आहे. समाजामध्ये अवयव दानाची जागृती झाल्याने व नागरिक पुढे येत असल्याने हे साध्य झाले आहे. यामुळे अनेक जणांना जीवदान मिळत आहे. अवयव दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात डॉ. संतोष हजारे, यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. सुदर्शन चौगुले यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यांना भूलतज्ञ डॉ. राजेश माने, डॉ. मंजुनाथ पाटील यांच्यासह गीता देसाई, बसवराज मजती यांचे सहकार्य लाभले. या शस्त्रक्रियेबद्दल रुग्णालयाचे संचालक डॉ. कर्नल एम. दयानंद यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.