For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रोकडून ‘पुष्पक’चे यशस्वी लँडिंग

06:29 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्रोकडून ‘पुष्पक’चे यशस्वी लँडिंग
Advertisement

री-युजेबल लाँच व्हेईकलचे परीक्षण : भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Advertisement

वृत्तसंस्था/ चित्रदुर्ग

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने शुक्रवार, 22 मार्च 2024 रोजी पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहन (री-युजेबल लॉन्च व्हेईकल) तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली. इस्रोचे ‘पुष्पक’ प्रक्षेपण वाहन शुक्रवारी सकाळी 7.10 वाजता कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी श्रेणीत यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले. ‘पुष्पक’ पूर्णपणे स्वदेशी असल्याची माहिती इस्रोकडून निवेदनाद्वारे देण्यात आली.

Advertisement

पुष्पक हे एक खास प्रकारचे स्पेस शटल आहे. जे अवकाशात उपग्रह आणि माल वाहून नेण्याचे काम करेल. यापूर्वी 2 एप्रिल 2023 रोजी इस्रो, डीआरडीओ आणि भारतीय हवाई दलाने संयुक्तपणे त्याची लँडिंग चाचणी घेतली होती. त्यावेळी पुष्पकला चिनूक हेलिकॉप्टरमधून 4.5 किमी उंचीवरून सोडण्यात आले. त्यानंतर आता पुष्पक वाहनानेच यशस्वी लँडिंग केले. या यशस्वी चाचणीच्या माध्यमातून भारताने उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात जगात आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. सध्या अनेक मोठे देश पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपक वाहनांवर काम करत आहेत. एलन मस्क यांची ‘स्पेस एक्स’ ही कंपनी पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपक वाहनाची चाचणी यशस्वी करणारी पहिली खासगी संस्था ठरली होती. ‘स्पेस एक्स’ने 2015 मध्ये पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपक वाहन यशस्वीरित्या उतरवले होते. फ्रान्स, अमेरिका, जपान, चीनसह अनेक खासगी संस्थादेखील पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपक वाहनांवर काम करत आहेत.

डीआरडीओ आणि भारतीय हवाई दल (आयएएफ) यांच्या सहकार्याने रविवारी पहाटे कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) वर ही मोहीम पार पडली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पुन्हा वापरता येणारे प्रक्षेपण वाहन अवकाशात पाठवल्यानंतर ते पृथ्वीवर परतले. याद्वारे आणखी एक उपग्रह पुन्हा प्रक्षेपित केला जाऊ शकतो. आतापर्यंत उपग्रह प्रक्षेपण वाहने आकाशात गेल्यावर नष्ट होत होती. सुऊवातीला विंग बॉडीचे विमान हेलिकॉप्टरमधून साडेचार किलोमीटर उंचीवर नेण्यात आले आणि विमानाप्रमाणे धावपट्टीवर उतरण्यासाठी सोडण्यात आल्याची माहिती इस्रोने दिली. हवाई पट्टीवर उतरवताना रॉकेटला थांबवण्यासाठी ब्र्रेक पॅराशूट सिस्टिमसह अनेक विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

‘आरएलव्ही’मुळे आर्थिक बचत

‘आरएलव्ही’ हे भारतीय संरक्षण संशोधन संस्था आणि भारतीय हवाई दलाच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. ‘आरएलव्ही’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपग्रह पाठवण्याचा खर्च कमी होईल. तसेच भारताला भविष्यातील उपग्रह प्रक्षेपण मोहिमा कमी खर्चात पूर्ण करणे शक्य होणार आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार, ‘आरएलव्ही’ हे मुळात एक स्पेस प्लेन असून त्याची रचना खूप उंचावरून ताशी 350 किलोमीटर वेगाने लँडिंग करण्यासाठी केली गेली आहे.

Advertisement

.