गगनयान मिशनच्या इंजिनची यशस्वी हॉट टेस्ट
अंतराळ उड्डाणाच्या तयारीला वेग : महेंद्रगिरी येथे पार पडले परीक्षण
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने गगनयान मोहिमेसाठी आणखी एक मोठे यश मिळविले आहे. इस्रोने तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील स्वत:च्या प्रपल्शन कॉम्प्लेक्समध्ये गगनयान सेवा मॉड्यूल प्रप्लशन प्रणालीची (एसएमपीएस) दोन ‘हॉट टेस्ट’ यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. या परीक्षणांचा कालावधी एकदा 30 सेकंद तर दुसऱ्यांदा 100 सेकंद राहिला.
या परीक्षणाचा उद्देश गगनयानासाठी तयार केल्या जाणाऱ्या प्रणालीची संरचना आणि कार्यक्षमतेची पडताळणी करणे होता. हे परीक्षण गगनयान मोहिमेच्या तयारीचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा होता. यामुळे अंतराळप्रवासादरम्यान प्रप्लशन प्रणाली योग्यप्रकारे काम करेल हे सिद्ध झाले आहे. हे यश भारताच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल आहे.
प्रणालीची एकूण कामगिरी परीक्षणापूर्वी करण्यात आलेल्या अनुमानानुसार पूर्णपणे अधिक राहिली आहे. 100 सेकंदांच्या दीर्घ परीक्षणात सर्व रिअॅक्शन कंट्रोल सिस्टीम (आरसीएस) थ्रस्टर्सला वेगवेगळ्या पद्धतींनी (सातत्याने चालविणे आणि थांबून थांबून चालविणे) यशस्वीपणे चालविण्यात आले. तसेच सर्व लिक्विड एपोजी मोटर (एलएएम) इंजिनदेखील सोबत सक्रीय करण्यात आले.
गगनयानच्या या प्रप्लशन प्रणालीला इस्रोच्या लिक्विड प्रप्लशन सेंटरने (एलपीएससी) विकसित केले आहे. ही प्रणाली अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण याचा वापर अंतराळयानाला कक्षेत योग्यपद्धतीने पुढे नेणे आणि कुठल्याही आपत्कालीन स्थितीत मोहिमेला मध्येच रोखण्यासाठी केला जातो.
परीक्षणातून मिळाली महत्त्वपूर्ण माहिती
या प्रणालीत एकूण 5 एलएएम इंजिन (प्रत्येकाची क्षमता 440 न्यूटन) आणि 16 आरसीएस थ्रस्टर (प्रत्येकाची शक्ती 100 न्यूटन) सामील आहेत. या हॉट टेस्टदरम्यान पूर्वी करण्यात आलेल्या परीक्षणांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर यात काही सुधारणाही करण्यात आल्या, जेणेकरून प्रत्यक्ष उड्डाणसारख्या स्थितीचा अधिक चांगल्याप्रकारे सराव करता येईल.
आता ‘फुल ड्यूरेशन हॉट टेस्ट’
या यशस्वी परीक्षणांमुळे मिळालेल्या आत्मविश्वासासोबत लवकरच या प्रणालीची एक ’फुल ड्यूरेशन हॉट टेस्ट’ म्हणजेच पूर्ण अवधीचे परीक्षणही करणार असल्याचे इस्रोने सांगितले आहे. गगनयान मिशन भारताची महिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असून याचा उद्देश मनुष्याला पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेत पाठविण्याची भारताची क्षमता सिद्ध करणे आहे. या मोहिमेतून मिळणारा अनुभव भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असेल.