For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरिहंत हॉस्पिटलमध्ये शिशूंवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

11:00 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
अरिहंत हॉस्पिटलमध्ये शिशूंवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया
Advertisement

10 व 30 दिवसीय शिशूंवर शस्त्रक्रिया : डॉ. एम. डी. दीक्षित-सहकाऱ्यांचे कौतुक

Advertisement

बेळगाव : आजकाल लहान मुलांची शस्त्रक्रिया म्हटले की अंगावर शहारे येतात. पण अरिहंत हॉस्पिटलमध्ये नुकताच 10 व 30 दिवसांच्या बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील 10 दिवसांच्या बालकावर इंटरप्टेड आयोर्टिक आर्च रिपेयर (टाईप-2) व इराकमधील 30 दिवसांच्या बालकावर कोअरकेशन आयोर्टिक रिपेअर व पीडीए लायगेशन ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अरिहंत हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या रुपात भेटलेल्या देवदूतांनी अवघ्या 10 व 30 दिवसांच्या नवजात बालकांवर शस्त्रक्रियेचा नाजूक निर्णय यशस्वीपणे अमलात आणला. सदर 10 दिवसांचे बाळ दक्षिण गोवा येथील केपे व अवघ्या 30 दिवसांचे बाळ इराकमधील बगदाद येथील रहिवासी आहे.

गोव्यातील 10 दिवसांचे बाळ

Advertisement

गोव्यातील बेबी उर्फ प्रियांका नामक नवजात शिशूला जन्मानंतर त्रास जाणवू लागला. यामुळे तपासण्या व चाचण्या केल्यानंतर सदर मुलाच्या हृदयाला रक्तपुरठा करण्यात अडथळा निर्माण होत होता. हृदय कमकुवत झाले होते. हृदयाला छिद्र असल्याचेही निष्पन्न झाले. यावेळी डॉ. एम. डी. दीक्षित यांच्याकडून इंटरप्टेड आयोर्टिक आर्च रिपेयर (टाईप-2) हृदय शस्त्रक्रिया करून घेण्याचे ठरविले. डॉ. दीक्षित यांनी बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. या बालकाला केवळ 10 दिवसातच म्हणजे शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला.

इराकमधील 30 दिवसांचे बाळ

इराकमधील 30 दिवसांच्या आदम अब्बास अल झुआरी या नवजात शिशूच्या हृदयाला छिद्र होते. इरामधील डॉक्टरांनी पालकांना बाळावर डॉ. एम. डी. दीक्षित यांच्याकडून शस्त्रक्रिया करवून घेण्याचा सल्ला दिला. पालकांनी डॉ. एम. डी. दीक्षित यांच्याशी संपर्क साधून आदमच्या सर्व तपासण्या व चाचण्या केल्यानंतर कोअरकेशन आयोर्टिक रिपेयर व पीडीए लायगेशन शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. अभिषेक जोशी, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अविनाश लोंढे व सहकाऱ्यांनी या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. हॉस्पिटलचे चेअरमन सहकाररत्न रावसाहेब पाटील, संचालक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून दोन्ही बालकांच्या प्रकृतीची विचारपूस करून शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांचे कौतुक केले.

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने समाधानी

स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने पालकांनी अरिहंत हॉस्पिटलशी संपर्क साधल्यानंतर बाळांसह त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला पालकांना दिला. त्यावेळी विविध तपासण्या करून आम्ही लागलीच बालकांवर शस्त्रक्रिया केली. त्यांना 3 ते 4 दिवस अतिदक्षता विभागात ठेवून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असूनही बालकांना 8 दिवसात डिस्चार्ज देण्यात आला. आता परराज्य व परदेशातील रुग्ण आमच्यावर विश्वास ठेवून उपचारासाठी येत आहेत. रुग्णांच्या या विश्वासास आम्ही पात्र ठरलो याचा अभिमान असून हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया डॉ. एम. डी. दीक्षित यांनी दिली.

Advertisement
Tags :

.