योग्य वेळी योग्य संधीचा लाभ घेतल्यास यश निश्चित
डी. डी. कोसंबी व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प : माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणारे आदित्य गुप्ता यांचे उद्गार
पणजी : मानवी जीवनातील ध्येय साकार करण्यासाठी घड्याळ आणि त्यातील वेळ महत्त्वाची असते. योग्य वेळी आलेल्या संधीचा लाभ घेऊन योग्य निर्णय घेतल्यास यश निश्चित आहे. तीच चावी यशाकडे घेऊन जाते. माऊंट एव्हरेस्ट हे हिमशिखर चढताना वरील धडे मिळाले आणि ते सर्वांनी आचरणात आणावेत, असा सल्ला माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणारे आदित्य गुप्ता यांनी दिला. कला अकादमी पणजी येथे चालू असलेल्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवातील तिसरे पुष्प गुंफताना गुप्ता बोलत होते. ‘एव्हरेस्टपासून घेतलेले जीवनातील सात धडे’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. एव्हरेस्ट चढताना आलेले अनुभव आणि मिळालेले ज्ञान याचा सुरेख संगम साधून त्यांनी व्याख्यानातून प्रवासवर्णन शब्दबद्ध केले.
आव्हानांचा मुकाबला करावा
त्यांनी पुढे सांगितले की, ध्येय गाठताना अनेक आव्हाने येतात. त्यांचा मुकाबला करीत पुढे गेल्यासच यशाला गवसणी घालता येते. नाहीतर अपयशाला सामोरे जावे लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एव्हरेट शिखरावर जाताना अनेक ठिकाणी धोके निर्माण झाले. काही ठिकाणे तर मृत्यूचा सापळाच होती. तथापि त्यातूनही मार्ग काढून पुढे जाण्यास यश मिळाले, याची माहिती गुप्ता यांनी दिली. त्यासाठी त्यांनी अधूनमधून व्हिडिओ, फोटोंचा वापर केला.
धोक्यांची खुणगाठ महत्वाची
एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर त्यांनी ‘सेव्हन लाईफ लेसन्स फ्रॉम एव्हरेस्ट’ हे पुस्तकही लिहिले. धडे घेऊन पुढे कसे जायचे यावर विवेचन केले. विद्यार्थी, तरुण किंवा कोणीही व्यक्ती असो पुढे काय करायचे याचे गणित त्यांच्या मनात असते. ते ठरवताना पक्का निर्णय आणि तयारी करण्याची गरज आहे. प्रत्येक टप्प्यावर किंवा पायरीवर कोणते धोके संभवतात याची खुणगाठ आधीच बांधली तर आयत्यावेळी त्यावर उपाय सापडतो आणि धांदल होत नाही. त्याकरिता सकारात्मक आणि दक्ष राहणे जरुरीचे असते. अनेकजण सुरुवातीला उत्साहाने कामाला लागतात. परंतु कालांतराने तो उत्साह कमी होतो आणि ध्येय साकार करणे कठीण बनते, असेही गुप्ता यांनी निदर्शनास आणले.
पक्क्या तयारीने निर्णय घ्यावे
एव्हरेस्टपासून मिळालेले धडे जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी कसे उपयोगी ठरतात यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. एव्हरेस्टवर चढताना अनेकजण अर्ध्याहूनच माघारी फिरतात. परीक्षेत, राजकारणातही किंवा स्पर्धेत मर्यादित उमेदवारांचा कस लागतो. बाकीच्यांची तयारी नसल्यानेच ते मागे पडतात. म्हणून तयारी करून पक्का निर्णय घेणे याला ध्येयामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. तेच धडे एव्हरेस्टपासून आपण घेतले आणि ते तुम्ही घ्यावेत, असे आवाहन गुप्ता यांनी केले.