मालवण न.पालिकेच्या नळपाणी योजनेच्या कामाला कार्यारंभ आदेश
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालवणच्या सुधारित नळपाणी योजनेसाठी ४३ कोटी रु. निधी केला होता मंजूर
आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश
मालवण /प्रतिनिधी
मालवण शहरवासियांनी नगरपरिषदेची सत्ता शिवसेनेकडे दिल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी मालवणवासीयांची पाण्याची प्रमुख समस्या सोडवण्याच्या दृष्टीने मालवण नगरपरिषदेसाठी तब्बल ४३ कोटींची नळपाणी योजना मंजूर करून घेतली होती.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये पहिल्या प्रथम मालवण नगरपरिषदेत ही नळपाणी योजना मंजूर झाली आहे.मात्र या योजनेला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याने ही योजना रखडली होती. दरम्यान न्यायालयाने ही स्थगिती उठविल्याने या नळपाणी योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया आता पूर्ण झाली असून कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मतदारसंघातील सत्तेतील आमदार व मंत्र्यांना जमले नाही ते आमदार वैभव नाईक यांनी मालवण मध्ये करून दाखवले आहे. त्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, नगरविकास विभाग २ चे प्रधान सचिव के. गोविंदराज व नगरविकास विभागाचे संचालक मनोज रानडे यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी दिली आहे.