जुनी पेन्शनच्या दीर्घ लढ्याला यश; शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचे प्रतिपादन
कोल्हापूर प्रतिनिधी
जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सरकार दरबारी मोठ-मोठी आंदोलने केली. परंतू अलीकडे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन छेडत, अधिवेशनाच्या माध्यमातून सभागृहात आवाज उठवला. 1 नोव्हेंबर 2005 पुर्वीच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. येत्या काही दिवसात अद्यादेश काढला जाईल. शिक्षक आमदार म्हणून हा माझे एकट्याचे नव्हे तर कोल्हापुरातून सुरू केलेल्या जुनी पेन्शन योजनेच्या दीर्घ लढयाचे यश आहे, असे प्रतिपादन आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने मुख्याध्यापक संघातील आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. शिक्षक संघटनांच्या वतीने आमदार आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. पांडूरंग पवार यांनी ‘तुम्ही आमदार झाल्यापासून पेन्शनचा प्रश्न सोडवला....’ असे गीत सादर केले.
आमदार आसगावकर म्हणाले, जुनी पेन्शन बंद करून नवीन पेन्शन आणली, परंतू 1982 ची जुनी पेन्शन मिळाली पाहिजे, यासाठी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर राज्यभर मोर्चे निघाले, यातून सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीने अहवाल मंत्रिमंडळात जमा केला. त्यानंतर जुनी पेन्शन देण्यास मान्यता दिली. परंतू अंम्मलबजावणी होत नसल्याने, अधिवेशन सुरू असताना संप पुकारला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत समितीचा अहवाल आला असून, येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापुर्वी निर्णय घेतला जाईल, असे सांगत. तत्पुर्वी काही निर्णय जाहीर केले. 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी जे कर्मचारी अंशत: अनुदानित तत्वावर होते. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना लागू करायची. 80 वर्षाच्यापुढे पेन्शनमध्ये वाढ करायची, हे निर्णय सरकारने जाहीर केले आहेत. ज्या दिवशी आदेश निघेल त्यादिवशी जुनी पेन्शनसाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे कोल्हापुरात बोलावून सत्कार करणार आहे.
शिक्षक नेते एस. डी. लाड, दादासाहेब लाड, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, बाबा पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी मिलींद पांगिरेकर, व्ही. जे. पोवार, के. पी. पोवार, बी. जी. बोराडे, विलास साठे, डी. एस. पाटील, बी. जी. काटे आदी उपस्थित होते.
टप्पा वाढीच्या निर्णयावर दिशाभूल केली
आंदोलनाच्यावेळी टप्पावाढीचा जो निर्णय दिला होता, त्या निर्णयावर शिक्षणमंत्र्यांनी नागपूरमधील अधिवेशनात दिशाभूल केली. यावर आम्ही सभात्याग करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू सर्वोच्च सभागृहाच्या पटलावर येणार याचे मान ठेवून आम्ही सभात्याग केला नाही.