धारवाडमधील यात्रेत पशुबळी रोखण्यात यश
दयानंद स्वामीजींचे प्रयत्न यशस्वी
बेळगाव : तबकद व्हन्नळ्ळी, ता. कलघटगी, जि. धारवाड येथील व्होळेम्मादेवी यात्रेत प्राणीहत्या रोखण्यात यश आले आहे. विश्वप्राणी कल्याण मंडळ व बसवधर्म ज्ञानपीठाचे अध्यक्ष दयानंद स्वामीजी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्राणीहत्येशिवाय यात्रा यशस्वी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशावरून यात्रेत प्राणीहत्या रोखण्याची मागणी धारवाड जिल्हा प्रशासनाकडे दयानंद स्वामीजी, सुनंदादेवी, शरणाप्पा कम्मार आदींनी केली होती. अहिंसा प्राणीदया अध्यात्म संदेश यात्रेच्या माध्यमातून कलघटगी, तडस, तबकद व्हन्नळ्ळी परिसरात गेल्या आठवडाभर जागृती करण्यात आली होती.
देवस्थान मंडळ, भाविक व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सहकार्यामुळे प्राणीहत्या रोखण्यात यश आल्याचे स्वामीजींनी सांगितले. याआधी व्होळेम्मादेवी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात प्राणीहत्या केली जात होती. मात्र, मंदिरामध्ये प्राणीहत्या रोखावी, भक्तिभावाने सदाचाराने यात्रा यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले होते. धारवाडचे जिल्हाधिकारी दिव्या प्रभू, पोलीसप्रमुख गोपाल ब्याकोड, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख नारायण बरमनी, पोलीस उपअधीक्षक एस. एम. नागराज यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पोलीस व विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्राणीहत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.