डोळ्यात अडकलेला मधमाशीचा काटा काढण्यात यश
येळ्ळूर रोड, केएलई शताब्दी हॉस्पिटलची कामगिरी : तरुणाची वाचवली दृष्टी
बेळगाव : येळ्ळूर रोड येथील केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या नेत्ररोग विभागाने 18 वषीय तरुणाच्या डाव्या डोळ्यात अडकलेला मधमाशीचा काटा यशस्वीरित्या काढून त्याची दृष्टी सुरक्षित राखण्यात यश मिळविले आहे. संबंधित तरुणाला डाव्या डोळ्यात तीव्र वेदना, टोचल्यासारखी भावना, लालसरपणा व सतत अस्वस्थता जाणवत होती. त्यामुळे त्याने रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागात उपचारासाठी धाव घेतली. दोन - तीन दिवसांपूर्वी मधमाशी डोळ्याला धडकली होती. त्यानंतर डोळ्यातील वेदना आणि सूज वाढत गेल्याने त्याने नेत्रतज्ञ डॉ. विशाल काखंडकी यांची भेट घेतली. वैद्यकीय तपासणीदरम्यान डाव्या डोळ्याच्या लिम्बल भागात मृत मधमाशी आढळून आली. डॉक्टरांनी ती तातडीने आणि सुरक्षितपणे काढून टाकली.
पुढील तपासणीत मधमाशीचा काटा कॉर्नियाच्या स्ट्रोमामध्ये अडकला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर भूल देऊन करण्यात आलेल्या सूक्ष्म शस्त्रक्रियेद्वारे कॉर्नियामध्ये अडकलेला काटा यशस्वीपणे काढण्यात आला. शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली असून रुग्णाची दृष्टी सुरक्षित आहे. त्याची प्रकृतीही उत्कृष्ट आहे. याबाबत डॉ. एच. बी. राजशेखर म्हणाले, रुग्णालयातील डॉक्टरांनी तत्पर आणि अचूक उपचार करून तरुणाची दृष्टी वाचविली आहे. अशा प्रकारच्या जटिल व सूक्ष्म उपचारांमधून संस्थेचे वैद्यकीय कौशल्य आणि सेवाभाव अधोरेखित होतो, असे सांगितले. नवीन एन. म्हणाले, रुग्णकेंद्रित सेवा, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा व अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्यसेवा देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ही यशस्वी शस्त्रक्रिया त्याचाच एक भाग आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. संजय कंबार यांनी डोळ्याला कोणतीही दुखापत झाल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले.