कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवाजी विद्यापीठात मोत्यांच्या शेतीला यश

12:58 PM Mar 02, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

शिवाजी विद्यापीठात गोड्या पाण्यातील मोत्यांच्या शेतीचा प्रयोग एक वर्षांपूर्वी सुरू केला. हा मोती पिकविण्याचा प्रयोग अपेक्षेपलिकडे यशस्वी झाला असून एका वर्षात मोती निर्माण करण्यात संशोधकांना यश आले आहे. विद्यापीठात पिकलेला पहिला मोती महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते भेट स्वरुपात देण्यात आला आहे.

Advertisement

शिवाजी विद्यापीठाच्या गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्राचे समन्वयक तथा प्राणीशास्त्रज्ञ डॉ. नितीन कांबळे म्हणाले, कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्राणीशास्त्र अधिविभाग परिसरात गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्राचे उद्घाटन केले. केंद्राने महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या मान्यतेने या ठिकाणी गोड्या पाण्यातील मोत्यांविषयी संशोधन व विकासाचे काम सुरू केले. मोती या क्षेत्रातील यशस्वी प्रयोगशील उद्योजक दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर प्राण्यांचे संगोपन केले. योग्य देखभाल आणि संवर्धनामुळे या शिंपल्यांपासून चांगल्या प्रकारचे मोती साकार होऊ लागले आहेत. काही मोती शिंपले 18 महिन्यांपर्यंत ठेवण्यात येणार आहेत. पाण्यात संवर्धनासाठी सोडलेल्या 100 शिंपल्यांमधील मृत्यूदर 20 टक्के इतका आढळला. म्हणजे शंभरातील 80 शिंपले जगले. सर्वसाधारणपणे यांचा मृत्यूदर हा 40 टक्क्यांच्या घरात असतो. तो कमी करण्यात यश आले. त्यासाठी पाण्याच्या टाकीमधील पाणी नदीप्रमाणे प्रवाही राखले. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी सातत्याने कायम राखली. पाणी प्रदूषित होणार नाही, याची दक्षता घेत पाण्याचा दर्जा दररोज तपासून त्याचे गुणधर्म कायम राहतील, या दृष्टीने प्रयत्न केले. प्राण्यांची योग्य देखभाल करताना त्यांना आवश्यक त्या प्रमाणात अन्नपुरवठा केला. प्राण्याचे वय, वजन, त्याची संवेदनक्षमता आदी गुणधर्मांचाही अभ्यास केला. त्यांच्या प्रकृतीची योग्य काळजी घेतली. हवेतील दूषित घटक पाण्यात मिसळून त्याला कोणते विकार होणार नाहीत, याचीही काळजी घेतली. प्रि-ऑपरेटिव्ह, ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह या तिन्ही टप्प्यांमधील सर्व प्रक्रिया जंतूसंसर्गविरहित पद्धतीने होतील, याचीही दक्षता घेतली.

शिवाजी विद्यापीठातील सर्वच घटकांचे या उपक्रमात भरीव योगदान व कष्ट आहेत. नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरुन ऑन जॉब ट्रेनिंग आणि कौशल्य आधारित उपक्रम म्हणून मोती संवर्धन केंद्राच्या संशोधन व विकास कार्यात सहभाग नोंदवत आहे. पारंपरिक शेतीला पर्याय तसेच जोडव्यवसाय म्हणून विद्यार्थी व शेतकरी या क्षेत्राची निवड करू शकतात. मोत्यांची योग्य प्रकारे शेती (लागवड) करून उत्तम आर्थिक नफा मिळू शकतो. योग्य प्रशिक्षण, कठोर नियोजन आणि उत्तम बीज यापासून चांगल्या प्रकारच्या मोत्यांचे उत्पादन मिळते. मोत्यांच्या लागवडीसाठी फारसे भांडवल लागत नाही.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article