आमठाणे धरणाचे गेट उघडण्यात यश
रात्रभर घेतलेल्या मेहनतमुळे काम फत्ते : नाविक दलाचे लाभले मोठे सहकार्य.,जल शुध्दीकरणाला मुबलक पुरवठा सुरु
डिचोली : आमठाणे धरणातील पाणी सोडण्याची अडकलेली गेट उघडण्यात जलस्रोत खात्याला मोठ्या परिश्रमानंतर काल बुधवारी पहाटे 5.40 वाजता यश आले. गेले चार दिवस चाललेल्या या युध्दपातळीवरील कामाला अखेर काल यश आले. नाविक दलाच्या पाणबुड्यांनी सुमारे 30 तास अविश्रांत काम केल्यानंतर हे काम फत्ते झाले आहे. गेट खोलण्यास उशीर झाल्याच्या कारणावरुन या उशिरासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला होता. आमठाणे धरणाची गेट खोलण्यात आल्यानंतर अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी नदीतून पाण्याचा पुरवठाही सुरू झालेला. त्यामुळे अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातून कच्चे पाणी शुध्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
त्यामुळे बार्देश, तिसवाडी तालुक्यातील लोकांना पाणीपुरवठा आता सुरू होणार आहे. कुडासे-दोडामार्ग, महाराष्ट्र येथे तिळारी धरणाचा कालवा फुटल्यामुळे तेथून येणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला दरदिवशी मुबलक पाणी पुरविण्याची जबाबदारी आमठाणे धरणावर आली आहे. परंतु आमठाणे धरणाचे पाणी सोडणारे गेट खाली पाण्यात अडकल्याने पाण्याचा पुरवठा योग्य व समाधानकारक होत नव्हता. त्यामुळे अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामावर परिणाम झाला होता. परिणामी बार्देश, तिसवाडी तालुक्यातील लोकांना पाण्याचा पुरवठा होत नव्हता. जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी साळ येथून पंपिंग केलेले पाणी थेट अस्नोडा नदीत सोडले होते.
परंतु हे पाणी आवश्यक प्रमाणात नसल्याने त्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुरविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे लोकांचे पाण्याविना हाल झाले होते. आमठाणे धरणाची सदर गेट उघडण्यासाठी खात्यातर्फे युध्दपातळीवर काम सुरू होते. या कामात तज्ञांचा सल्ला घेण्यात येत होता. अखेर नाविक दलाची मदत घेण्यात आली. नाविक दलाचे पाणबुडे आळीपाळीने सदर गेट खोलण्याच्या कामात गुंतले होते. परंतु अथक प्रयत्नांनंतरही खाली अडकलेले गेट सुटत नसल्याने जलस्त्राsत खात्याच्या अधिकाऱ्यांवर बराच ताण आला होता. परंतु सोमवारपासून मंगळवारपर्यंत दिवसा व रात्रीही काम केल्याने मंगळवारी पहाटे गेट खोलण्यात यश आले. यावेळी खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांच्यासह इतर अभियंतेही आमठाणे धरणावर ठाण मांडून होते.