Kolhapur News : कष्ट आणि त्याग केल्यानेच यशाला गवसणी घालू शकतो : नगराध्यक्षा रश्मी कोठावळे
मलकापूरमध्ये युवा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
शाहूवाडी : स्पर्धेच्या युगात आपली गुणवत्ता सिद्ध करायची असेल तर त्यासाठी कष्टाची तयारी आणि त्यागी वृत्ती अंगी असणं गरजेचं आहे . तरच आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो असे प्रतिपादन मलकापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रश्मी शंतनु कोठावळे यांनी मलकापूर येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले .
मलकापूर येथे वैश्य हिंदू वाणी समाज मलकापूर यांच्यावतीने शालेय गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप व त्याच बरोबर यश अमोल महाजन याची वायुसेनेत प्लाईंग ऑफीसर म्हणून निवड झाल्या बद्दल सत्कार समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या .पुढे बोलताना रश्मी कोठावळे म्हणाल्या की आपले ध्येय आपण निश्चित करून त्या दिशेने वाटचाल केली तर आपण यशस्वी होऊ शकतो . यासाठी आपल्याकडे जिद्द आणि संघर्ष करण्याची तयारी असणे आवश्यक आहे . उज्वल भवितव्य घडविण्यासाठी कठोर परिश्रम केल्यानेच आपण यशस्वी होतो आणि इतरांना देखील ते आदर्शवत ठरत असते .
यावेळी संदीप गांधी ,रमेश कामेरकर , डॉ संजय गांधी , आदीनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमास नूतन नगरसेविका साक्षी गांगण , माजी नगराध्यक्ष दिनानाथ सक्रे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ नागरिक , युवक ,युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते .युवा वर्गाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रसंग घेतले .