For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्योजकाच्या फसवणुकीतील ३६ लाखांची रक्कम गोठवण्यात यश

01:40 PM Sep 16, 2024 IST | Abhijeet Khandekar
उद्योजकाच्या फसवणुकीतील ३६ लाखांची रक्कम गोठवण्यात यश
Crime fraud
Advertisement

45 लाख रुपये 4 खात्यांवर वर्ग : उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल येथील खात्यांचा शोध; टेरर फंडिंगच्या भीतीने कोल्हापुरातील उद्योजकास 81 लाखांचा गंडा

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

टेरर फंडिंगची भीती घालून कोल्हापुरातील उद्योजकाची 81 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला होता. या प्रकरणी उदय तुकाराम दुधाणे (वय 61, रा. अंबाई डिफेन्सजवळ, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या फसवणुकीतील रक्कम उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथील 4 खात्यांवर वर्ग करण्यात आली आहे. 45 लाख रुपयांची रक्कम खर्च करण्यात आली आहे. तर 36 लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, एनआयएचे (राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा) अधिकारी असल्याचे सांगत चार ते पाच सायबर भामट्यांनी उद्योजक उदय दुधाणे यांना ऑनलाईन अटक केली. हैदराबाद येथील एका व्यक्तीकडून दहशतवादी समूहाला झालेल्या टेरर फंडिंगमध्ये तुमच्या बँक खात्याचा वापर झाला आहे. या गंभीर गुह्यात कारवाई करण्याची भीती घालून संशयितांनी दुधाणे यांना ऑनलाईन ओलिस ठेवले. एनआयएचे अधिकारी तुमच्या मागावर आहेत. कोणत्याही क्षणी ते तुम्हाला संपवू शकतात, अशी भीती घालून त्यांनी 6 ते 11 सप्टेंबरच्या दरम्यान दुधाणे यांना शिवाजी पार्क येथील एका हॉटेलमध्ये ऑनलाईन अटकेत (डिजिटल अरेस्ट) राहण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील 81 लाख रुपये चार बँक खात्यांवर वर्ग करण्यास सांगितले होते. यानुसार दुधाणे यांनी ही रक्कम आरटीजीएस आणि अन्य मार्गाने विविध खात्यांवर वर्ग केली आहे.

Advertisement

चार खात्यांवर रक्कम वर्ग
रक्कम वर्ग केलेल्या बँकांच्या खात्यांचा तपशील पोलिसांनी शनिवारी दुधाणे यांच्याकडून घेतला आहे. रक्कम वर्ग झालेली संबंधित चार बँक खाती उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथील असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित बँकांशी ई-मेलद्वारे पत्रव्यवहार केला असून, खाती गोठविण्याची विनंती केली आहे. खातेदारांचे नाव, पत्ते, मोबाईल नंबर मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती तपास अधिकारी सुशांत चव्हाण यांनी दिली.

36 लाख रुपये गोठविण्यात पोलिसांना यश
या गुह्यामध्ये राजारामपुरी पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेतली आहे. फसवणुकीच्या 81 लाखांपैकी 45 लाख रुपयांची रक्कम फसवणूक करणाऱ्यांनी विविध मार्गाने काढून घेतली आहे. तर 36 लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. बँकांना दोन दिवस सुटी असल्यामुळे ही रक्कम परत घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा येत आहे.

सिस्टीम जनरेटेड कॉल
दुधाणे यांना भामट्यांनी सिस्टीम जनरेटेड कॉल केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हे कॉल सहजासहजी ट्रेस करणे अवघड असते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हे फोन कॉल करण्यात येतात. भामट्यांनी दुधाणे यांना सहा दिवसांच्या कालावधीमध्ये 200 हून अधिक फोन केल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. हे सर्व फोन व्हॉट्स अॅपद्वारे करण्यात आले आहेत.

Advertisement

.