कष्ट, शिस्त अन् प्रामाणिकपणाने यशस्वी व्हा
कोल्हापूर :
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्याय आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये महान कार्य केले आहे. त्यांच्या या महान भूमीचे, विचारांचे तुम्ही वारसदार आहात. कोल्हापूरमध्ये शेती, उद्योग, आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये विकासाची प्रचंड क्षमता आहे. त्यांच्या विचाराचा वारसा घेवून विद्यार्थ्यांनो शिस्त, कृष्ट, प्रामाणिकपणाचा अवलंब करून यशस्वी व्हा, असा कानमंत्र राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दिला.
शिवाजी विद्यापीठातील 61 व्या दीक्षांत समारंभात अध्यक्षस्थानावरून कुलपती राधाकृष्णन बोलत होते. दीक्षांत समारंभात बंडू कोळी याला राष्ट्रपती सुवर्णपदक तर क्रिशा नोरोन्हा कुलपती सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात आले. 38 पीएच. डी. पदवी, 16 विशेष पारितोषिक देवून स्नातकांना गौरवण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा संचालक डॉ. आशिष लेले उपस्थित.
राज्यपाल तथा कुलपती राधाकृष्णन म्हणाले, विद्यापीठाच्या नावासह छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्यांच्या शौर्याची आठवण करून देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी वेल्लोर, तंजावर, गिंजी (सेनजी) आणि तामिळनाडूतील इतर काही ठिकाणी भेट दिली होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कोल्हापूर भूमी देशभरात शिक्षण, सामाजिक-आर्थिकदृष्ट्या प्रगतीशील धोरण आवलंबण्यासाठी ओळखली जाते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि कृपेने आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार केले पाहिजे. शिवाजी विद्यापीठ शिक्षणाच्या समग्र दृष्टिकोनातून या तत्वज्ञानाचे उदाहरण देते. शिवाजी विद्यापीठ उत्कृष्टतेचा वारसा कायम ठेवेल आणि समाजाच्या प्रगतीत योगदान देत राहील, असा विश्वास कुलपती राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठ ग्रामीण असले तरी कालसुसंगत तांत्रिक बदल स्विकारत आहे. बी. एस्सी. स्पोर्टसारखे अनेक कौशल्याधिष्टित अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या आहेत. पीएम उषा योजनेअंतर्गत विद्यापीठाला 20 कोटी रूपये अनुदान मंजूर केले आहे. नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात शिवाजी विद्यापीठ राज्यात अव्वल आहे. कौशल्याधिष्टीत शिक्षण घेणाऱ्या मुलींचे शुल्क राज्य शासन भरत आहे. ही खूप मोठी विद्यार्थीनींसाठी मदतच म्हणावी लागेल. तसेच सुवर्णमहोत्सवी वर्षातील फक्त 17 लाख रूपये अनुदान राहिले असून उर्वरीत अनुदान विद्यापीठाला दिले आहे. आता हिरक महोत्सवी वर्षाकडे विद्यापीठ वाटचाल करीत असून या वर्षातही विद्यापीठाला अनुदान दिले जाईल, असे आश्वासन देत भुयारी मार्गाच्या कामाचे कौतुक केले.
प्रमुख पाहुणे डॉ. आशिष लेले म्हणाले, पदवीदान प्रदान हा यशस्वी करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या समर्पण, त्याग आणि कठोर परिश्रमाचा उच्चबिंदू आहे. हवामान बदलांमुळे जागतिक साथीच्या आजारांपासून ते दुर्गम आरोग्यसेवा अशा अभूतपूर्व आव्हानांना जग तोंड देत आहे. या समस्या गुंतागुंतीच्या असून जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. जीवनात आणि सभोवतालच्या जगात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. आजच्या जगाला भेडसावणाऱ्या जटिल समस्या सोडवण्यासाठी कार्यक्षम टीमवर्कची आवश्यकता आहे. मानव्यशास्त्र, सामाजिक शास्त्र, कायद्या, विज्ञान आणि अभियांत्रिकी आदी क्षेत्रात नाविन्यपूर्णतेचा आत्मा असतो. नवोपक्रम आपल्या यशामध्ये कळीची भूमिका बजावेल. धैर्याने आणि दृढनिश्चयाने पुढे जा. तुमचे ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी योजना तयार करा. मार्ग सापडत नसेल, तर नवीन मार्ग तयार करा. तुमच्यासाठी संधींचे दरवाजे सहज उघडत नसतील, तर स्वत:चे दरवाजे तयार करा,असे आवहनही डॉ. लेले यांनी विद्यार्थ्यांना केले.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाला नॅकचे एप्लसप्लस मानांकन मिळाल्यामुळे अनेक संशोधन प्रकल्प विद्यापीठाला व संशोधकांना मिळाले. एनआयआरएफ रँकिंगमध्ये 51 ते 100 बँडमध्ये स्थान प्राप्त केले आहे. ब्रिक्स देशांच्या दक्षिण आशियाई देशांत 187 वे स्थान मिळवले आहे. जागतिक आघाडीच्या दोन टक्के विद्यापीठांमध्ये दोन टक्यामध्ये विद्यापीठातील 14 संशोधकांचा समावेश आहे. ए. डी. सायंटिफिक क्रमवारीत 96 संशोधक आहेत. विद्यापीठात वारंवार बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण देण्याचा प्रयत्न शिवाजी विद्यापीठ सातत्याने करते.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी पदवी प्रमाणपत्राबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालक नंदिनी पाटील आणि धैर्यशील यादव यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी मानले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, अधिष्ठाता, अधिकार मंडळाचे सदस्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- कोल्हापूरात जागतिक दर्जाचे शूटिंग रेंजची आवश्यकता
राजर्षी शाहू महाराजांनी क्रीडा क्षेत्राला विशेषत: कुस्तीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. कोल्हापूरमध्ये उत्कृष्ट क्रीडा केंद्र आणि जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज असावे, असे मत राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.