For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भुयारी मागर् असून अडचण नसून खोळंबा

11:55 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
भुयारी मागर् असून अडचण नसून खोळंबा
Advertisement

मध्यवर्ती-शहर बसस्थानकाला जाण्यासाठीचा मार्ग समस्यांच्या गर्तेत : सुविधा पुरविण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहरातील मध्यवर्ती बसस्थानक व शहर बसस्थानक यांना जोडण्यासाठी निर्माण करण्यात आलेला भुयारी मार्ग विविध समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. मार्गावर अस्वच्छता व अपुऱ्या प्रकाशामुळे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुमारे 200 मीटर लांबीचा हा भूमिगत मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र संबंधित यंत्रणेकडून योग्य देखभाल न झाल्याने या मार्गाचा वापर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. यामुळे परिवहन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्या सोडविण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

भुयारी मार्गावर आवश्यक प्रमाणात प्रकाशयोजना नसल्याने दिवसाही अंधाराचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांना मोबाईल टॉर्चचा आधार घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. अनेक प्रवासी भीतीपोटी या मार्गाचा वापर टाळत असून पर्यायी मार्गाचा अवलंब करत आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी येथे पूर्णत: अंधार पसरत असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी हा भुयारी मार्ग असूनही प्रत्यक्षात उपयोगात नसल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement

दिव्यांची सोय करून प्रवाशांना सुरक्षा प्रदान करा

याशिवाय भुयारी मार्गावर येण्यासाठी दोन्ही बाजूंना लिफ्टची सुविधा उभारण्यात आली आहे. मात्र या लिफ्ट अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दिव्यांग व्यक्तींना जिन्याचा आधार घ्यावा लागत असून त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या सुविधांचा लाभ मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यासाठी परिवहन विभागाकडून प्रलंबित कामे पूर्ण करून भुयारी मार्गावर आवश्यक सुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. विशेषत: दिव्यांची सोय करून प्रवाशांना सुरक्षा प्रदान करण्याचीही गरज आहे.

परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे भुयारी मार्ग निष्प्रभ

भुयारी मार्गावर अस्वच्छतेमुळे नियमित साफसफाई होत नसल्याचेही दिसून येत आहे. मार्गावर पान, पानमसाला, गुटखा खाऊन थुंकल्याने अस्वच्छता पसरली आहे. तसेच प्रकाशासाठी दिवे नसल्याने कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अस्वच्छ वातावरण यामुळे प्रवाशांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे हा भुयारी मार्ग निष्प्रभ ठरत आहे. संबंधित अधिकारी आपली जबाबदारी पार पाडत आहेत की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने लक्ष घालून भुयारी मार्गामध्ये स्वच्छता राखणे, योग्य प्रकाशयोजना करणे व लिफ्ट सेवा त्वरित सुरू करणे आवश्यक असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Advertisement
Tags :

.