पामतेल लागवडीला अनुदान
क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न : रोपांचे मोफत वाटप
बेळगाव : पामतेल उत्पादनात वाढ व्हावी यासाठी बागायत खात्यामार्फत 2024-25 सालाकरिता ताडीच्या रोपांचे मोफत वाटप आणि अनुदान दिले जाणार आहे. संबंधित शेतकऱ्यांना अर्जाचे आवाहन केले आहे. खात्याने पाम विस्तार वाढीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार सुविधा व अनुदान दिले जाणार आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत 400 हेक्टर क्षेत्रात पाम लागवड केलेली असली तरी अडीच हजार हेक्टरात पाम झाडे लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी शेतकऱ्यांना ताडीच्या रोपांचे मोफत वाटप केले जाणार आहे. डिझेल पंपसेट, ठिबक सिंचन, कूपनलिका, वॉटर हार्वेस्टिंग युनिट, गांडूळ खत युनिट, चॉप कटर, ट्रॅक्टर ट्रॉली त्याबरोबरच उंच झाडापासून फळे काढण्यासाठीची उपकरणे दिली जाणार आहेत. यासाठी अनुदान उपलब्ध केले जाणार आहे. अनुसूचित जाती-जमातीतील शेतकरी, अल्पसंख्याक शेतकरी व महिला शेतकऱ्यांना राखीव अनुदान ठेवले जाणार आहे. जिल्ह्यातील रामदुर्ग, खानापूर, गोकाक, बैलहोंगल, चिकोडी आदी ठिकाणी पामतेलाच्या झाडांची लागवड केली जाते. लागवड झाल्यानंतर 30 ते 35 वर्षे उत्पादन मिळते. खात्याकडून मोफत रोपे दिली जाणार आहेत. शासनाकडून प्रतिटन हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे पामतेल शेती फायदेशीर आहे. एक एकरात चार वर्षांत 10 टनपर्यंत उत्पन्न होऊ शकते. अधिक रासायनिक खत व कीटकनाशकांचीही आवश्यकता भासत नाही. शेतकऱ्यांनी पामतेल लागवडीकडे वळावे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका बागायत खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन खात्याने केले आहे.
कमी खर्चात अधिक उत्पन्न
पामतेल लागवडीसाठी मोफत रोपे आणि अनुदानही दिले जाणार आहे. यातून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, कूपनलिका खोदाई आणि इतर शेती उपयोगी यंत्रे खरेदी करता येणार आहेत. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून पामतेलाकडे पाहिले जात आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
-महांतेश मुरगोड, सहसंचालक, बागायत खाते