अहवाल 48 तासांमध्ये द्या, अन्यथा आंदोलन
कोल्हापूर :
शहराची हद्दवाढ रखडल्याने नागरीकांच्या मुलभूत हक्कांवर गदा येत आहे. वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत जागेची उपलब्धता आणि पायाभूत सोई सुविधा देण्यात असमर्थ आहे, असा अहवाल महापालिकेने 48 तासांत द्यावा. अन्यथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासमोर जवाब दो आंदोलन करु असा इशारा शहर हद्दवाढ कृती समितीने सोमवारी बैठकीत दिला. हद्दवाढीबाबत प्रशासन सकारात्मक पावले उचलत नसेल तर शहरातील नागरीकांना घरफाळ्यासह मनपाचा कर भरु नका, असे आवाहन करणारी मोहिम राबवावी लागेल असा सज्जड इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
हद्दवाढ प्रश्नी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मनपा प्रशासनासोबत बैठक झाली. सुरुवातीला अॅङ बाबा इंदूलकर यांनी लोकसंख्येनुसार शहरात जागेची उपलब्धता आहे काय या तपशीलाची मागणी केली. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी एक वर्षापूर्वी तांत्रिक मुद्यांच्या आधारे हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना केल्या होत्या, त्याचे पुढे काय झाले ? असा सवाल केला. माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी ग्रामीण भागातील नागरीक मनपाच्या सुविधा वापरुनही हद्दवाढीविरोधात भूमिका घेत असल्याकडे लक्ष वेधले. भाजपचे महेश जाधव यांनी ग्रामीण भागातील गैरसमज दुर करण्यात मनपाची यंत्रणा कमी पडत असल्याचे सांगितले. कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी मनपा प्रशासनाकडून हद्दवाढीसाठी ठोस भूमिका घेण्यात येत नाही आहे. प्रशासनाची हद्दवाढ करण्याची मानसिकता आहे काय असा सवाल उपस्थित केला. किशोर घाटगे यांनी राज्यशासनाने हद्दवाढीचा थेट निर्णय घेण्याची मागणी केली. कॉम्रेड दिलीप पवार यांनी महापालिकेने सहा वेळा हद्दवाढीबाबत प्रस्ताव पाठवले मात्र पाठपुरावा का केला नाही असा प्रश्न उपस्थित केला.
मनपाच्या वतीने खुलासा करताना सहाय्यक नगररचनाकार विनय झगडे म्हणाले, हद्दवाढीसाठी मनपा प्रशासन सकारात्मक आहे. शहराची हद्दवाढ व्हावी हिच मनपाची ठाम भूमिका आहे. राज्यशासनाने ज्या ज्यावेळी हद्दवाढीच्या अनुषंगाने माहिती अथवा अहवाल मागवला, त्या त्या वेळी मनपाने तात्काळ त्याची पुर्तता केली आहे. यामध्ये प्रशासनाने कोणतीही हयगय केलेली नाही. ग्रामीण आणि शहरी भाग हद्दवाढीच्या अनुषंगाने एकत्रिकरण होताना नगररचना आणि ग्रामविकास विभाग यांच्यातील प्रशासकीय सोपस्कार पुर्ण करण्याची एक मोठी प्रक्रिया आहे. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी हद्दवाढीसाठी ग्रामीण भागातील नागरीकांचा गैरसमज दुर करण्यासाठी प्रयत्न व्हावा, तसेच हद्दवाढ समर्थक आणि विरोधक घटकांची एकत्रित बैठक होण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी बाबा पार्टे, अशोक भंडारी, विवेकानंद गोडसे, सचिन पोवार, उदय भोसले, दत्ता टिपुगडे, प्रसन्न शिंदे, चंद्रकांत सुर्यवंशी, अमर शिंदे, सुशिल भांदिगडे, सुनिल पाटील, संग्राम जरग आदि उपस्थित होते.
- विनय झगडे यांची दिलगिरी
बैठक सुरु असताना विनय झगडे यांना वारंवार फोनवर बोलत होते. यामुळे कृती समितीचे पदाधिकारी संतप्त झाले. शहराच्या महत्वाच्या प्रश्नावर बैठकीत चर्चा करत आहोत असे सांगत वरिष्ठ अधिकारीच फोनच्या संभाषणात गुंग असतील तर आम्ही बैठक सोडून जातो असा आक्रमक पवित्रा घेतला. हद्दवाढीमध्ये नगररचना विभागाची महत्वाची भूमिका असतानाही या प्रश्नाचे गांभीर्य नसल्यामुळे कृती समितीचे पदाधिकारी बैठक सोडून जाउ लागले. यामुळे बैठकीचे वातावरण तणावपुर्ण बनले. पदाधिकाऱ्यांनी कडक शब्दांत झगडे यांना जाब विचारला. यावर नरमलेल्या विनय झगडे यांनी पुन्हा असा प्रकार घडणार नाही असे सांगून पदाधिकाऱ्यांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली.
- कृती समितीच्या मनपा प्रशासनाकडे मागण्या
शहरातील मुलभूत समस्या सोडवा
ग्रामीण भागातील नागरीकांचे गैरसमज दुर करा
हद्दवाढीनंतरच्या प्रस्तावित सुविधा जाहीर करा
तांत्रिक प्रस्ताव तयार करा
करवीर, शहर दक्षिण आमदारांसह दोन खासदारांसोबत बैठक घ्या हद्दवाढीने शहरातील पायाभुत सुविधा रखडल्याचा अहवाल द्या