For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वण-कारापूर प्रकल्पाचा अहवाल सादर करा

06:02 AM Jun 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
सर्वण कारापूर प्रकल्पाचा अहवाल सादर करा
Advertisement

पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाचा बिल्डरला आदेश

Advertisement

 त. भा. प्रतिनिधी

पणजी : डिचोली तालुक्यातील ‘सर्वण कारापूर’ येथील प्रस्तावित मेगा प्रकल्पाशी संबंधित बांधकाम कार्याबाबतच्या तक्रारींवर विचार करणे गोवा राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने स्थगित केले आहे. त्यामागील कारणे स्पष्ट करताना, एका जनहित याचिकेद्वारे यासंदर्भातील मुद्दे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर प्रलंबित असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत, सर्व्हे क्रमांक 148/0 आणि 176/1 मधील विकासकामांबाबतच्या तक्रारी व उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेली प्रकरणे यात बऱ्याचअंशी साम्य आहे. ‘न्यायालयीन शिस्त आणि सुसंगतता राखण्यासाठी‘ न्यायप्रविष्ट प्रकरणांच्या तत्त्वाचा आधार घेत, प्राधिकरणाने या टप्प्यावर त्या तक्रारींवर पुढील कार्यवाही न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

असे असले तरी, प्राधिकरणाने सर्व्हे क्रमांक 148/0 मध्ये हाती घेण्यात आलेल्या चार बांधकाम प्रकल्पांबाबत बिल्डरकडून स्पष्टीकरण मागवले आहे. ‘पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अधिसूचना, 2006’ अंतर्गत या विकासासाठी पर्यावरण मंजुरीची आवश्यकता आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्यांनी एकूण बांधकामाचे क्षेत्रफळ, प्रकल्पांमधील अंतर यांची माहिती मागविली आहे. तसेच तक्रारदार ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या अन्य मुद्द्यांवरील उत्तरेही देण्यास सांगण्यात आले आहे.

या महिन्याच्या प्रारंभी ग्रामस्थांनी राज्य पर्यावरण खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढून प्रकल्पाच्या जागेची पाहणी करण्याची तसेच प्रकल्पाला पर्यावरण मंजुरीची गरज आहे की नाही यावर निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्याशिवाय याबाबत निर्णय होईपर्यंत प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश देण्याची मागणीही त्यांनी केली होती.

Advertisement
Tags :

.