जयप्रभा स्टुडीओ संवर्धन व सुशोभीकरणासाठी प्रस्ताव सादर करा
कोल्हापूर :
जयप्रभा स्टुडीओ टिकवणं म्हणजे केवळ इतिहास जपणे असे नव्हे तर चित्रपट निर्मितीची संस्कृती टिकवण्याची जबाबदारी असून, या सिनेसृष्टीच्या वारशाला पुन्हा उभारी देण्याकरिता आणि पूर्ववत याठिकाणी पूर्ण क्षमतेने चित्रीकरण होण्यासाठी ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन, सुशोभिकरण आणि चित्रीकरणासाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्रणा, सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता १ कोटी निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती. याबाबत जयप्रभा स्टुडीओच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी आवश्यक निधी मागणी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांना दिल्या आहेत.
आमदार क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनामध्ये, जयप्रभा स्टुडिओ ही वास्तू कोल्हापूरचा अनमोल ठेवा आहे. भारतीय चित्रपट सृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होत असतना त्यातील ९६ वर्षांचा एकट्या कोल्हापूरचा वाटा आहे. यामध्ये जयप्रभा, शालिनी यासारख्या स्टुडिओंनी सिनेमा निर्मितीचा पाया रचून ठेवला. १९३४ साली छत्रपती सिनेटोन म्हणून राजाराम महाराजांनी जयप्रभा नावाचे जग उभे करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर कलातपस्वी भालजी पेंढारकर यांनी हा वारसा जपला. त्या काळातील मराठी सिनेमाची भाषा म्हणजे कोल्हापूरची भाषा होती. या स्टुडिओत शो मॅन राजकपूर यांच्या चेहऱ्याला नारदाच्या भूमिकेत पहिला मेकअप लागला. याच भूमिकेच्या मानधनातून त्यांनी मुंबईला आरके स्टुडिओ उभा केला. कोणत्याही सुविधा नसताना इथे स्क्रिप्ट टू स्क्रिन सिनेमा तयार झाला. अशा या ऐतिहासिक स्टुडीओची सद्यस्थितीत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे याठिकाणी सिनेमा, नाटक आदी चित्रीकरण पूर्णत: बंद आहे. गेल्या काही महिन्यात या ठिकाणी पूर्वीप्रमाणे चित्रीकरण व्हावे यासाठी पुढाकार घेतला असून, याठिकाणी एक भक्तीगीत चित्रीकरण करण्यात आले आहे. जयप्रभा स्टुडीओ टिकवणं म्हणजे केवळ इतिहास जपणे असे नव्हे तर चित्रपट निर्मितीची संस्कृती टिकवण्याची जबाबदारी असून, या सिनेसृष्टीच्या वारशाला पुन्हा उभारी देण्याकरिता आणि पूर्ववत याठिकाणी पूर्ण क्षमतेने चित्रीकरण होण्यासाठी ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन, सुशोभिकरण आणि चित्रीकरणासाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्रणा, सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कोल्हापूरची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडीओच्या संवर्धन व सुशोभिकरणासाठी र.रु.१ कोटी (अक्षरी र.रु.एक कोटी फक्त) निधीची तरतूद अशी मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तपासून कार्यवाही करण्याच्या सूचनादेखील महापालिका आयुक्त यांना दिल्या आहे.
जयप्रभा स्टुडीओच्या मूळ जागेत चित्रीकरण करण्याचा गेल्या काही महिन्यात कलाकारांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. गेल्या काही महिन्यात याठिकाणी लाईट, कॅमेरा, अॅक्शनचा आवाज पुन्हा घुमला. परंतु, याठिकाणी चित्रीकरणासाठी अत्यंत अपुऱ्या सुविधा असल्याने चित्रीकरणात अडथळे निर्माण होत असल्याचे दिसून येते. या कलाकारांना आवश्यक अत्याधुनिक यंत्रणा, सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला सर्वतोपरी प्रयत्न असून, या वास्तूचे संर्वधन देखील तितकेच महत्वाचे असल्याने स्टुडीओची तात्काळ डागडुजी व कलाकारांना मुलभूत सोई- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक कोटी रुपयांचा निधी मागितला असून, याबाबत शासन सकारात्मक आहे. यासह जयप्रभा स्टुडीओ पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून आणखी दहा कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणार आहे. येत्या काळात कलेच्या या माहेरघरात कलाकारांचा आणि चित्रिकरणाचा ओघ पुन्हा सुरु झाल्याचे दिसून येईल, असा विश्वासही आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केला.