नंदगड ऐतिहासिक तलावाचा फोटोग्राफी सर्व्हे सादर करा
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : तलावाच्या विकासाचे काम क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा क्षेत्र विकास प्राधिकरणतर्फे हाती घेण्यात येणार
बेळगाव : नंदगड (ता. खानापूर) येथील ऐतिहासिक कुंभार तलावाचा फोटोग्राफी सर्व्हे करून पुन्हा एकदा अहवाल सादर करावा. शक्यतो लवकर कामाची सुरुवात करून वेळेत काम पूर्ण करावे, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. नंदगड येथील ऐतिहासिक कुंभार तलावाच्या विकासासंबंधी माहिती देण्यासाठी शुक्रवारी जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या पूर्वतयारी बैठकीमध्ये सीईओ शिंदे बोलत होते. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नंदगड क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा समाधीस्थळाजवळील कुंभार तलावाच्या विकासाचे काम क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा क्षेत्र विकास प्राधिकरणतर्फे हाती घेण्यात येणार आहे. तलावाच्या बाजूने असलेल्या गटारीचे पाणी व इतर पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे व्हावा, याकडे जिल्हा पंचायत व नंदगड ग्राम पंचायतीने लक्ष देऊन काम हाती घ्यावे, अशी सूचना सीईओ शिंदे यांनी केली.
ग्राम पंचायत पंधरावा वित्त आयोग, स्व-संपन्मूल व अन्य योजनांतर्गत अनुदानाचा वापर करून कामे हाती घ्यावीत. गटारीचे पाणी व इतर कोणतेही निरुपयोगी पाणी तलावात मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. कुंभार तलावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तलावाच्या भोवताली सुरू असलेली कामे व आणखी कोणती कामे हाती घेणे शक्य आहे, याची माहिती पंचायतराज खात्याचे साहाय्यक संचालक गणेश के. एस. व योजना संयोजक (प्रोजेक्ट असोसिएट्स) ओंकार कोरी यांनी दिली. त्यानंतर जिल्हा पंचायत, तालुका पंचायतच्या अधिकाऱ्यांनी, तसेच इंजिनिअरिंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर माहिती दिली. जिल्हा पंचायतीचे योजना संचालक रवी बंगारेप्पन्नावर, उपसचिव (विकास) बसवराज अडवीमठ, मुख्य योजना अधिकारी गंगाधर दिवटर, कार्यकारी अभियंता सुंदर कोळी, खानापूर तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री, साहाय्यक कार्यकारी अभियंता राजेंद्र जाधव, नरेगाच्या साहाय्यक संचालिका रुपाली बडकुंद्री, ग्राम पंचायत विकास अधिकारी सागरकुमार बिरादार, साहाय्यक अभियंता सुब्रमण्य पाटील, तांत्रिक संयोजक विश्वनाथ हट्टीहोळी यांसह विविध खात्याचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.