प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या वक्तव्याचे राजकीय भांडवल
हिंदू रक्षा महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा दावा
डिचोली : सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या डीएनएची मागणी करणारे वक्तव्य हे यापूर्वीच झाले होते. प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केवळ ते गोव्यासमोर मांडले आहे. यावरून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु आज या विषयाचे विनाकारण भांडवल करण्यात येत असून त्यास राजकीय पक्ष जबाबदार आहे. या दबावाला सरकारने बळी पडू नये. आम्ही सर्व हिंदू संघटना प्रा. वेलिंगकर यांच्या पाठीशी ठामपणे आहेत, असे प्रतिपादन हिंदू रक्षा महाआघाडीचे सहनिमंत्रक नितीन फळदेसाई यांनी केले.
प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात डिचोली पोलीस स्थानकात करण्यात आलेल्या तक्रारीवरून प्रा. वेलिंगकर यांना अटक करून डिचोली पोलीस स्थानकावर आणण्यात येणार असल्याची माहिती विविध हिंदू संघटनांना मिळाल्यानंतर हिंदू धर्माभिमानी लोकांनी डिचोली पोलीस स्थानकावर गर्दी केली. परंतु दिवसभर प्रा. वेलिंगकर यांना डिचोलीत आणलेच नाही. प्रा. वेलिंगकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे. त्यांचे सदर वक्तव्य हे कोणीतरी केलेल्या वक्तव्यावर आधारित आहे. जे यापूर्वी करण्यात आले आहेत. त्याचा उल्लेख करून प्रा. वेलिंगकर यांनी आपल्या भाषणात केला आहे. यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखू शकत नाही. परंतु या विषयाला राजकीय भांडवल करण्यात येत आहे, असेही फळदेसाई यांनी म्हटले आहे.
प्रा. वेलिंगकर यांनी केलेले वक्तव्य हे इतिहासाला धरूनच आहे. त्यांनी ही मागणी केली नसून त्यांनी कुठेतरी झालेल्या वक्तव्याला गोव्यात पुष्टी दिली आहे. त्यांचा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही सर्व हिंदू संघटना प्रा. वेलिंगकर यांच्या पाठिशी असून त्यांचे समर्थन करीत आहोत, असे यावेळी हिंदू जनजागृतीचे सत्यविजय नाईक यांनी म्हटले. डिचोली पोलीस स्थानकावर सकाळपासून मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आत प्रवेश करणाऱ्या दोन्ही गेट बंद करण्यात आल्या होत्या. दोन्ही गेटवर पोलीस तैनात होते. या परिसरात प्रा. वेलिंगकर यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. परंतु प्रा. वेलिंगकर यांना डिचोलीत आणणार नसल्याची कल्पना मिळाल्यानंतर सर्वांनी पोलीस स्थानकाचा परिसर सोडला.