For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुभाषचंद्र बोस यांचे नातू तृणमूलबाहेर

01:47 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुभाषचंद्र बोस यांचे नातू तृणमूलबाहेर
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

कोलकाता

भारताचे थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत सुभाषचंद्र बोस यांचे चुलत नातू चंद्र कुमार बोस यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचा त्याग केला आहे. आपण व्यक्तीगत कारणासाठी पक्ष सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आधी ते भारतीय जनता पक्षात होते. तथापि, काही वर्षांपूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी या पक्षाचाही त्याग केल्याने त्यांच्या पुढचा निर्णय काय असेल, यासंबंधी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे त्यागपत्र ममता बॅनर्जी यांच्याकडे पाठविले आहे. तृणमूलने प्रतिक्रिया दिलेली नाही.

Advertisement

भारतीय जनता पक्षात मी प्रवेश केला, ही माझी चूक होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडताना व्यक्त केली होती. आता तृणमूल काँग्रेस सोडताना त्यांनी व्यक्तीगत कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी 2023 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते भारतीय जनता पक्षात 2016 मध्ये आले होते. त्यांनी 2016 मध्ये याच पक्षाचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढविली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर लोकसभा निवडणूकही लढविली होती. 2016 मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल शाखेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, 2020 मध्ये त्यांना हे पद सोडावे लागले होते.

चंद्रकुमार बोस हे कोण...

चंद्रकुमार बोस यांचा जन्म पश्चिम बंगालच्या एका प्रभावशाली घराण्यात झाला आहे. ते माजी संसद सदस्य आणि प्रसिद्ध वकील अमेयनाथ बोस यांचे पुत्र आहेत. अमेयनाथ बोस हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ज्येष्ठ बंधू सरतचंद्र बोस यांचे पुत्र आहेत. अशा प्रकारे चंद्रकुमार बोस हे सुभाषचंद्र बोस यांचे चुलत नातू आहेत. त्यांनी लंडनमध्ये अर्थशास्त्र विषयाची पदवी घेतली असून नंतर कोलकाता येथील आयआयएममधून व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी कंपनी आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.

Advertisement
Tags :

.