Sangli News: जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचा कारभार केवळ दहा कर्मचाऱ्यांवर, चौकशांमुळे ताण
नियमित कामकाजामुळे या कार्यालयातील कर्मचारी तणावाखाली आले
सांगली : कारखाने, सुतगिरण्या, पतसंस्था, विकास सोसायट्या, गृहनिर्माण, खरेदी-विक्री यासह सुमारे साडेचार हजाराहून अधिक सहकारी संस्थांचे जाळे असणाऱ्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचा कारभार अवघ्या दहा कर्मचाऱ्यांवर सूरू आहे. त्यामुळे संस्थांच्या नियमीत निवडणुका, चौकशा, तक्रारी निवारण, याबरोबरच नियमित कामकाजामुळे या कार्यालयातील कर्मचारी तणावाखाली आले आहेत.
कर्मचाऱ्यांअभावी कार्यालयाची दप्तर दिरंगाई वाढली आहे. नियमीत कामांचा ताण अधिक असताना वरिष्ठ कार्यालयाकडून दररोज मागवण्यात येणारी नियमीत माहिती पुरवताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयासाठी २७ कर्मचाऱ्यांचा स्टाफ मंजूर आहे.
त्यापैकी कनिष्ठ लिपीक सहा, वरिष्ठ लिपीक दोन, यंत्रमागदेशक एक, हातमाग पर्यवेक्षक दोन, शिपाई एक अशा विविध प्रकारच्या सोळा जागा रिक्त आहेत. गेल्या दोन वर्षापासून या कार्यालयाची ही अवस्था असल्याने सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. दोन हजारांवर संस्थांच्या निवडणुका यावर्षी तेरा सहकारी संस्थांच्या निवडणूक ऐनवेळी म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यात स्थगित करण्यात आल्या आहेत.
तीन सहकारी संस्थांच्या निवडणूका मतदार याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्थगित झाल्या आहेत. महापूर, शेतीची कामे आदी कारणांमुळे या निवडणूका ३० सप्टेंबर पर्यंत स्थागित करण्यात आल्या आहेत. परंतू आगामी वर्षात जिल्ह्यातील विकास सोसायट्याबरोबर विविध प्रकारच्या दोन हजारांवर संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. इतक्या कमी कर्मचाऱ्यांच्या साथीने या निवडणूका कशा पार पाडायच्या या विचारानेच विभागातील अधिकारी गांगरले आहेत