For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उपकनिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा आजपासून

06:06 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
उपकनिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा आजपासून
Advertisement

वृत्तसंस्था  / रांची :

Advertisement

16 वी ‘हॉकी इंडिया उप-कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा’ आज बुधवारी येथे पाच सामन्यांसह सुरू होत असून यामध्ये तीन विभागांमधील एकूण 29 संघ एकमेकांशी भिडतील. ही स्पर्धा 12 एप्रिलपर्यंत चालेल. सहभागी संघ ‘विभाग अ’, ‘विभाग ब’ आणि ‘विभाग क’ या विभागांमध्ये गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या ’पदोन्नती आणि पदावनती’ या स्वरूपात स्पर्धा करतील.

‘विभाग अ’मधील संघ अजिंक्यपद मिळवण्यासाठी चुरशीने लढतील, तर ‘विभाग ब’ आणि ‘विभाग क’मधील अव्वल दोन संघांना पदोन्नती मिळेल. याउलट ‘विभाग अ’ आणि ‘विभाग ब’मधील तळाच्या दोन संघांना पुढील स्पर्धेत पदावनतीचा सामना करावा लागेल. ‘विभाग अ’मध्ये 12 संघांचा समावेश असून त्यांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. या विभागातील बाद फेरीचे सामने 9 एप्रिलपासून सुरू होतील आणि 12 एप्रिल रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. यजमान संघ ’हॉकी झारखंड’ हा ’गट अ’मध्ये प्रमुख स्थानी असून त्यांच्यासोबत बिहार आणि महाराष्ट्र हे संघ असतील.

Advertisement

’गट ब’मध्ये ओडिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे. ’गट क’मध्ये हरियाणा, मध्यप्रदेश आणि मणिपूर हे संघ स्पर्धा करतील, तर ‘गट ड’मध्ये मिझोराम, ‘हॉकी उत्तर प्रदेश’ आणि छत्तीसगड यांचा समावेश आहे. ’विभाग ब’मध्ये 1 ते 6 एप्रिल या कालावधीत लीग स्वरूपात सामने खेळवले जातील आणि संघांची विभागणी दोन गटांमध्ये करण्यात आली आहे. ‘गट अ’मध्ये दिल्ली, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव, तामिळनाडू, बंगाल आणि आसाम हे संघ आहेत. ‘गट ब’मध्ये चंदिगड, उत्तराखंड, गुजरात, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

‘विभाग क’मधील सामने देखील 1 ते 4 एप्रिल या कालावधीत लीग स्वरूपातच खेळवले जातील. त्यात ‘गट अ’मध्ये केरळ, तेलंगण आणि गोवा यांचा समावेश आहे, तर ‘गट ब’मध्ये जम्मू-काश्मीर, पुद्दुचेरी, राजस्थान आणि त्रिपुरा हे संघ आहेत.  हे सर्व सामने रांची येथील मरंग गोमके जयपाल सिंग अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम’वर खेळवले जातील. सर्व विभागांमध्ये संघांना विजयासाठी तीन गुण आणि सामना बरोबरीत सुटल्यास एक गुण मिळेल. ’विभाग अ’मधील बाद फेरीचे सामने जर बरोबरीत सुटले, तर ‘एफआयएच’च्या नियमांनुसार ’शूटआउट’द्वारे त्यांचा निकाल लावला जाईल.

Advertisement
Tags :

.