For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपा सर्वसाधारण सभेसाठी प्रांताधिकाऱ्यांची निरीक्षकपदी नियुक्ती

06:32 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
मनपा सर्वसाधारण सभेसाठी  प्रांताधिकाऱ्यांची निरीक्षकपदी नियुक्ती
Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा आदेश : आजच्या सभेला विशेष महत्त्व

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

महानगरपालिकेच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांची तर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रांताधिकारी श्रवण नाईक यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश मंगळवार दि. 29 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला असून आदेशाची प्रत माहितीसाठी प्रादेशिक आयुक्त व मनपा आयुक्तांना पाठविली आहे. त्यामुळे आजच्या मनपाच्या सर्वसाधारण बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Advertisement

महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुमारे दीड महिन्यानंतर बुधवार दि. 30 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीच्या अजेंड्यावर नगरविकास खात्याच्या 29 ऑगस्टच्या पत्राचा विषयही घेण्यात आला आहे. सदर सभेत बेळगावच्या सीमाप्रश्नासंदर्भातील ठराव आणि महापालिकेच्या ठरावांबाबत राज्य शासनाच्या आदेशांचा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे. दि. 24 सप्टेंबर रोजी नगरप्रशासन संचलनालयाकडून प्राप्त झालेल्या ई-मेलनुसार, तसेच प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांनी दिलेल्या मौखिक आदेशानुसार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेबाबतची माहिती यापूर्वीच मनपा आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविली आहे. त्यानुसार मनपा आयुक्तांची मागणी व प्रादेशिक आयुक्तांच्या मौखिक आदेशावरून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निरीक्षक म्हणून प्रांताधिकारी श्रवण नाईक यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आजच्या सर्वसाधारण सभेतील कामकाजाची नोंद आणि प्रक्रियेचे पालन याला महत्त्व प्राप्त झाले आहे. बैठकीचे कामकाज नियमानुसार होते की नाही, अजेंड्यावरील विषयांवर कोणत्या प्रकारे चर्चा होते, तसेच ठरावांची प्रक्रिया कशी पार पडते, यावर निरीक्षकांचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे आजच्या मनपाच्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Tags :

.