For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्ञानेश्वरी अभ्यासाने सर्व सुखाची प्राप्ती होते

06:21 AM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्ञानेश्वरी अभ्यासाने सर्व सुखाची प्राप्ती होते
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

ज्ञानेश्वरी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे आध्यात्मिक कल्याण व्हावे ह्यासाठी श्रोत्यांनी आपले म्हणणे लक्ष देऊन ऐकावे अशी माउलींना कळकळ वाटते पण नुसती कळकळ वाटून उपयोग नाही हे लक्षात घेऊन माउली श्रोत्यांची विनवणी करताना म्हणतात, अहो मी तुम्हाला वचन देतो की, मी सांगतोय ते तुम्ही लक्ष देऊन ऐका म्हणजे सर्व सुख मिळण्याची पात्रता तुमच्या अंगी येईल. सर्व सुख म्हणजे पांडुरंगाची प्राप्ती होय. जे मन लाऊन ज्ञानेश्वरी ऐकतील, वाचतील आणि त्यातल्या शिकवणुकीप्रमाणे वागतील त्यांना रूप पाहता लोचनी ह्या त्यांच्या प्रसिद्ध अभंगात त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सुखाचे आगर असलेले बाप रखुमादेवीवर असलेल्या पांडुरंगाची प्राप्ती होईल अशी खात्री ते देतात. ह्यातील मन लावून हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. जे लोक मन लावून ज्ञानेश्वरी वाचतील, त्यातील उपदेशाचा स्वीकार करून त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यातील पांडुरंग जागृत होईल, त्यामुळे ते स्वत:च पांडुरंग होतील. त्यांनी पांडुरंग व्हावं अशी माऊलींची इच्छा आहे म्हणून ते म्हणतात की, मन लावून ज्ञानेश्वरी वाचा आणि पांडुरंगाची प्राप्ती करून घ्या.

पुढे श्रोत्यांना मोठेपणा देताना ते म्हणतात, तुम्ही सर्व जाणकार असल्यामुळे तुम्हाला वाटेल की, हे काय हा आढ्यातेने सांगतोय पण मी तुमच्यापेक्षा लहान असल्याने ‘लक्ष द्यावे’ ही माझी लडिवाळपणाची विनंती आहे त्यातून तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील तर हट्ट करणाऱ्यांचे लाड पुरवले जातात व त्यांच्या मनोरथाचे उंच डोलारे पूर्ण होतात, मनाने रचलेले कल्पित पदार्थही प्रत्यक्ष प्राप्त होतात. तुमच्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नतारूप मळा टवटवित होतो. म्हणून तुमची कृपादृष्टी माझ्यावर असू द्या. आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो. येथे देखील जर आम्ही लडिवाळपणा करण्यास भ्यालो तर मग आमचं समाधान कोण करणार? लेकरु बोबडे बोलत असले, वेडेवाकडी पाऊले टाकत असले तरी त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते, त्याप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम आमच्यावर जडावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज, आम्ही सलगी करत आहोत.

Advertisement

स्वत:कडे कमीपणा घेताना माउली म्हणतात, वास्तविक पाहिले तर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांपुढे ‘माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल’ असे बोलण्याची माझी कुठं योग्यता आहे? कारण आपण सर्वज्ञ असल्यामुळे आपणास केव्हा कुठं लक्ष द्यावे हे सहजच कळते. तसेच आपण स्वत: सुखरूप असल्यामुळे ‘माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणजे सुखाला प्राप्त व्हाल’ हे माझे बोलणे धारीष्ट्याचे आहे. पुढे म्हणतात, तुम्ही सरस्वतीच्या मुलासारखे आहात आणि तिचा मुलगा स्वभावत:च सर्व जाणत असतो. स्वत:ला काजव्याची उपमा देऊन म्हणतात, काजवा कितीही मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही, त्याला काय करणार?

क्रमश:

Advertisement
Tags :

.