अर्थसंकल्पाचा अभ्यास करून प्रतिक्रिया द्यावी
कॉंग्रेसच्या टीकेवर दामू नाईक यांचे प्रत्युत्तर
पणजी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात गोव्याला काय काय दिले आहे, त्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांचा अभ्यास करावा व त्यानंतरच बोलावे. उगीच ‘उचलली जीभ ...’ करू नये, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काँग्रेसचे आरोप आणि टीकेला उत्तर दिले आहे. मंगळवारी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी पक्षाच्या चार्टड अकाऊंटंट विभागाचे प्रमुख जयराम खोलकर यांचीही उपस्थिती होती. विद्यमान अर्थसंकल्प हा आधुनिक भारताचा रोडमॅप आहे, त्याचबरोबर तो विकासाभिमुख असून सामान्यांचे हित साधणारा आहे.
हा अर्थसंकल्प नील अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे, असे गौरवोद्गार नाईक यांनी काढले. विरोधकांनी कितीही टीका केलेली असली तरी या अर्थसंकल्पाने गोव्यासाठी भरपूर दिलेले आहे. खास करून गोव्याची खास ओळख असलेल्या नारळ आणि काजू या दोन्ही उत्पादनांच्या वाढीसाठी तरतूद तसेच मच्छीमार व्यवसायाला आधार देणारी व्यवस्था या अर्थसंकल्पात असल्याचे नाईक यांनी नमूद केले. हा अर्थसंकल्प विकासाला दिशा देणारा, अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आहे. याचाच अर्थ परिपूर्ण असा अर्थसंकल्प असून त्यासाठी अर्थमंत्र्यांचे प्रयत्न अभिनंदनीय आहेत. अर्थसंकल्प हा देशासाठीचा असतो. कोणत्याही विशिष्ठ राज्यासाठी असत नाही. त्यामुळे गोव्याला काहीच देण्यात आले नाही अशी जी टीका काँग्रेस करत आहे, ती अर्थहीन आहे, असे नाईक यांनी पुढे सांगितले.