सेवाशर्तीसह कायद्याचा अभ्यास करा
सुटाचे प्रा. सुधाकर मानकर यांचा प्राध्यापकांना सल्ला
विद्यापीठमध्ये कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर
प्राध्यापकांनी विद्यापीठ कायदा, सेवाशर्ती, नवीन शैक्षणिक धोरण व यु.जी.सी. ड्राफ्ट रेग्युलेशनचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असा सल्ला प्रा. सुधाकर मानकर यांनी दिला.
शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) तर्फे महाविद्यालयीन नवनियुक्त प्राध्यापकांची कार्यशाळा शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागामध्ये घेण्यात आली. नियोजन ‘सुटा‘ जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये सांगलीचे डॉ. युवराज पवार यांनी नवनियुक्त प्राध्यापकांना विद्यापीठ कायदा व उपलब्ध संधीविषयी मार्गदर्शन केले. विद्यापीठामधील विविध संधीची माहिती दिली. अध्यक्षस्थानी सांगली खजिनदार प्रा. बाबासाहेब सरगर होते. द्वितीय सत्रामध्ये डॉ. आर. जी. कोरबू यांनी प्राध्यापकांच्या विविध सेवाशर्ती, सेवापुस्तिका, स्थाननिश्चिती व वेतननिश्चिती विविध रजा याविषयी माहिती दिली. अध्यक्षस्थानी डॉ. तुषार घाटगे होते. तृतीय सत्रामध्ये डॉ. ज्ञानदेव काळे, सातारा यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे निर्माण होणारी सेवांतर्गत आव्हाने विषयी माहिती दिली. अध्यक्षस्थानी प्रा. दिनकर नांगरे होते. चौथ्या सत्रामध्ये डॉ. प्रकाश कुंभार यांनी यु.जी.सी. ड्राफ्ट रेग्युलेशन 2025 विषयी प्राध्यापकांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल याविषयी माहिती दिली. अध्यक्षस्थानी सुटाचे खजिनदार डॉ. अरुण शिदे होते. स्वागत व प्रास्ताविक सुटा जिल्हा कार्यवाह प्रा. डी. गजानन चव्हाण यांनी केले.
प्राध्यापकांनी विचारलेले प्रश्न व शंकांचे निरसन केले. सूत्रसंचालन डॉ. सुनीता अमृतसागर यांनी केले. आभार डॉ. वैशाली सारंग यांनी मानले. यावेळी प्रा. सर्जेराव जाधव, डॉ. महमंद पाटील, डॉ. योगिता पाटील, प्रा. संजय देसाई, सुटा पदाधिकारी, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त प्राध्यापक उपस्थित होते.