विद्यार्थ्यांना आता आठवड्यातून सहा दिवस मिळणार अंडी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील मुलांना सप्टेंबरपासून आठवड्यातून 6 दिवस अंडी वितरण करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री मधू बंगारप्पा यांनी दिली.
सरकारी आणि अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन दिवस अंडी वितरित केले जाते. आता सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना आठवड्यातून चार दिवस अंडी वितरण केले जाणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. पोषण आहार योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शेंगा चिक्की किंवा केळी दिली जात आहे.
जुलै महिन्यात राज्य सरकारने अझीम प्रेमजी फाऊंडेशनशी तीन वर्षांचा करार केला होता. या फाऊंडेशनच्या मदतीने राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील मुलांना आठवड्यातून 6 दिवस उकडलेली अंडी वितरित करण्यात येणार आहे. याकरिता सरकारला 1,500 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. यामुळे राज्यातील 55 लाख मुलांना लाभ मिळणार आहे.