अद्यापही विद्यार्थी बूट-मोजांच्या प्रतीक्षेतच
अनुदान शाळांपर्यंत न पोहोचल्याने पालकवर्गातून नाराजी
बेळगाव : अर्धे शैक्षणिक वर्ष संपले तरी अद्याप सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना बूट व मोजे मिळालेले नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जुने किंवा फाटलेले बूट घालून शाळा गाठावी लागत आहे. राज्य सरकारकडून बूट व मोजांसाठी अनुदान मंजूर झाल्याचे सांगूनही अद्याप ते शाळांपर्यंत पोहोचले नसल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. जून 2025 पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. दसऱ्यापूर्वी सहामाही परीक्षाही घेण्यात आल्या. आता शाळा सुरू झाल्याने सहामाही परीक्षांचा निकालही देण्यात येत आहे. परंतु, अद्याप 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना बूट व मोजे देण्यात आलेले नाहीत. पालकवर्गातून शिक्षक, मुख्याध्यापकांकडे यासाठी चौकशी केली जात असली तरी अनुदानच न मिळाल्याने शिक्षक अनुत्तरित होत आहेत.
2025-26 या वर्षाकरिता राज्य सरकारने 111 कोटी रुपयांचा निधी सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना बूट व मोजे खरेदीसाठी राखीव ठेवला होता. पहिली ते पाचवीसाठी 265 रुपये, सहावी ते आठवीसाठी 295 रुपये तर नववी व दहावीसाठी 325 रुपये अनुदान दिले जाते. शाळांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाते. मुख्याध्यापक तसेच एसडीएमसी कमिटीने या अनुदानाच्या रकमेतून बूट व मोजे खरेदी करावयाचे असतात. बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्वच सरकारी शाळांना अद्याप हे अनुदान मिळालेले नाही. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी पावसाळ्यात चप्पल घालून शाळांमध्ये येत असल्याचे दृष्टीस पडत आहे. सरकारकडून मोफत बूट व मोजे दिले जात असल्याने विद्यार्थ्यांची सोय होत असली तरी ते वेळेवर द्यावेत, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
सरकारकडून दिले जाणारे अनुदान (प्रति विद्यार्थी)
- पहिली ते पाचवी 265 रु.
- सहावी ते आठवी 295 रु.
- नववी ते दहावी 325 रु.