विद्यार्थ्यांनी तणाव न घेता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी
राहुल शिंदे यांचा बारावी विद्यार्थ्यांना कानमंत्र
बेळगाव : फेब्रुवारी-मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या बारावी परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती किंवा तणाव न घेता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत परिश्र्रमपूर्वक अभ्यास केला असून ते परीक्षेसाठी पूर्णपणे तयार आहेत. बारावी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याने शांतमनाने परीक्षा लिहिणे आवश्यक आहे, असा कानमंत्र जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी दिला. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम प्रश्नपत्रिका नीट व शांतपणे वाचून समजून घ्यावी. सुरुवातीला सोपे वाटणारे प्रश्न सोडवून नंतर उर्वरित प्रश्नांची उत्तरे लिहावीत.
त्यामुळे दिलेल्या वेळेत पेपर पूर्ण करण्यास मदत होईल. कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता परीक्षा देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा व उपाययोजना केल्या आहेत. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण, भीती किंवा ताण निर्माण होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचा उत्तम निकाल लागावा, यासाठी व्याख्याते, विद्यार्थी, पालक व अधिकारी परिश्र्रम घेत आहेत. बारावी परीक्षेत उत्कृष्ट यश मिळविणाऱ्या व जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा जिल्हा पंचायततर्फे गौरव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.