लिंगराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट
कैद्यांच्या प्रशिक्षण-पुनर्वसनाची घेतली माहिती
बेळगाव : केएलई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. कारागृहातील सुधारणा प्रक्रिया व समाजातील पुनर्वसन उपक्रमाविषयी माहिती करून घेण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती. आपल्या या भेटीत विद्यार्थ्यांनी कारागृहातील प्रशासकीय व्यवस्था, कैद्यांकडून केल्या जाणाऱ्या कामांची माहिती मिळवली. कारागृहाचे अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांनी प्रशासकीय व्यवस्थेबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कारागृहातील विविध विभाग, कैद्यांसाठी असलेले शिक्षण, उद्योग, प्रशिक्षण उपक्रमाविषयी माहिती करून घेतली. कैद्यांचे पुनर्वसन व समाजात पुन्हा त्यांचे एकत्रीकरण यासाठी प्रशासन प्रयत्नशील असते, अशी माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी कारागृहातील कार्यशाळा, ग्रंथालय, ध्यानभवन आदी ठिकाणी भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचीही पाहणी करण्यात आली. या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजाबद्दल सहानुभूती, जबाबदारी आणि सुधारणात्मक दृष्टिकोन विकसित झाल्याचे सांगण्यात आले. विभागप्रमुख नवीन कणबर्गी, प्रा. सुश्मिता पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली 80 विद्यार्थ्यांनी कारागृहाला भेट दिली.