शिवाजी विद्यापीठातील मोफत योजनेचा खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा!
खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात शिक्षणात सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या सवलतीची माहिती देण्यासाठी नुकतीच शिवाजी विद्यापिठातील प्राध्यापकवर्गाने खानापूर येथे कार्यशाळा घेऊन माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते. यावेळी नवनाथ वालेकर म्हणाले, कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाला साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 2022-23 पासून सीमाभागातील 865 गावातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सवलतीच्या दरात विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जात आहे. विद्यापीठाने राबविलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा सीमाभागातील होतकरु विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
विद्यापीठाचे डॉ. श्रीपाल गायकवाड म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील अनुदानित अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शुल्क माफ असून विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी 25 टक्के सवलत देण्यात आली आहे. जे विद्यार्थी वसतिगृहासाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना वसतिगृहाचे शुल्कही माफ आहे. 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल अंतिम मुदत आहे. या योजनेचा लाभ खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले. डॉ. नवनाथ वालेकर व डॉ. कविता वड्राळे यांनीही माहिती दिली. यावेळी कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सहसचिव रणजीत पाटील, मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, संजीव पाटील, आबासाहेब दळवी, राजाराम देसाई, खानापूर को-ऑप. बँकेचे चेअरमन अमृत शेलार, अजित पाटील, पुंडलिक पाटील, केशव कळ्ळेकर आदी उपस्थित होते.
संपर्क साधण्याचे आवाहन
शिवाजी विद्यापीठातील मोफत व सवलतीच्या अभ्यासक्रमांचा गेल्यावर्षी खानापूर तालुक्यातील आठ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. त्यापैकी एका विद्यार्थ्याला 28 हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचाही लाभ मिळाला आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी डॉ. प्रकाश पवार, डॉ. नवनाथ वालेकर व डॉ. कविता वड्राळे, यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.