दहावी-बारावीचे विद्यार्थी व्यस्त
कोल्हापूर :
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावी फेब्रु-मार्च 2025 परीक्षेची तयारी विभागीय मंडळाकडून सुरू आहे. दहावी परीक्षा 357 परीक्षा केंद्रावर होणार आहे. बारावी परीक्षेसाठी 1 लाख 16 हजार 128 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला. तर दहावीसाठी 1 लाख 30 हजार 844 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरला. परीक्षेची वॉर्निंग वेळ, उत्तरपत्रिका वाटप, प्रश्नपत्रिका वाटप व लेखन प्रारंभ यासह परीक्षा सुरू झाल्यापासून ते पेपर सुटेपर्यंतची वेळ निश्चित झाली. तसेच परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह शिक्षण विभागाने तरतूद केली आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी केंद्र संचालक व पर्यवेक्षकांची आदलाबदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतू शिक्षक संघटनांनी विरोध केल्यामुळे अटी व शर्ती घालून निर्णय मागे घेतला. तसेच 2018 पासून 2024 पर्यंत ज्या केंद्रावर जास्तीत जास्त कॉपीचे प्रकार उघडकीस आले, अशा 57 केंद्रावरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक, लेखनिक, शिपाई बदलले. कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ हे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या मदतीने परीक्षेचे कामकाज पूर्ण करणार आहे. परीक्षा घेणे, परीक्षा झाल्यानंतर पेपर तपासणीसाठी मॉडरेटर व विषय तज्ञांची नियुक्तीही केली. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परिक्षेला 24 जानेवारीपासून प्रारंभ झाला. या परीक्षा 10 फेब्रुवारीला संपणार आहेत. त्यानंतर लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान आहे. तर दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. तर लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. या परीक्षांसाठी 176 केंद्रांवर 41 परिक्षकांची नेमणूक केली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्था प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात व्यस्त आहेत. तसेच जास्तीत जास्त सराव परीक्षा घेऊन आपल्या शाळा-महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल कसा लागेल यासाठी शिक्षकांकडून आटापिटा सुरू आहे.
- पालकांनी पाल्यावर दबाव आणू नये
कॉपीमुक्त परीक्षा होत असल्याने पालकांनी आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या वेळेच्या आधी आर्धा तास आपल्या पाल्याला हजर करावे. विद्यार्थी परीक्षेला येताना स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर आणू नये. तर हॉलतिकीट, ओळखपत्र, पेन, पेन्सील असावे. कोणत्याही गैरप्रकारांना पालकांनी बळी पडू नये. तसेच अभ्यासासंदर्भात पालकांना आपल्या मुलांवर कोणताही दबाव आणू नये.
- असा असणार पेपर
वेळ नियोजन
10.30 वॉर्निंग बेल
10.50 उत्तरपत्रिका वाटप
11.00 प्रश्नपत्रिका वाटप लेखन प्रारंभ
2.00 दहा मिनिटे बाकी
2.10 लेखन समाप्त
- बैठका घेऊन सूचना
कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी कस्टोडीयन आणि कोल्हापूर केंद्र संचालकांची बैठक घेऊन परीक्षेसंदर्भात पूरक सूचना दिल्या. आज (दि. 5) सातारा जिल्ह्याची बैठक त्यानंतर सांगली जिल्ह्यात बैठक घेतली जाणार आहे.
- पाठांतरासह वाचनावर भर
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर दिला असून नियमित पुस्तकांसह नोटस आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव सुरू आहे. तसेच परीक्षेच्या वेळापत्रकानुसार नियमित पुस्तकांचा अभ्यास, प्रश्नोत्तराचे पाठांतर सुरू आहे. दहावी-बारावीचे विद्यार्थी पुर्णपणे अभ्यासात व्यस्त असून दररोज एका विषयाचे वाचन करीत आहेत.