अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थीवर्ग अडचणीत
अभाविपतर्फे चन्नम्मा चौकात आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
बेळगाव : येत्या काही दिवसात शैक्षणिक परीक्षांना सुरुवात होणार आहे. परंतु, अनेक गावांमध्ये बसची व्यवस्था नसल्याने विद्यार्थी अडचणी येत आहेत. काही मार्गांवर तर अतिशय कमी बस धावत असून, याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेकवेळा परीक्षांना उशिरा पोहोचल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे बुधवारी चन्नम्मा चौक येथे आंदोलन करण्यात आले. शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रवासी वाढले तरी बसची संख्या मात्र आहे तीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दररोज ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषत: खानापूर, सुळेभावी, प्रभूनगर, मण्णीकेरी, मुत्यानट्टी, गणेशपूर, मुत्नाळ, बैलहोंगल परिसरातून बेळगाव शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. आरपीडी कॉर्नर व पहिले रेल्वेगेट परिसरात अनेक शाळा-महाविद्यालये आहेत. परंतु, काही बसचालक या दोन्ही बसस्टॉपवर बस थांबवत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना तासन् तास बसची वाट पहात थांबावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेनुसार बस उपलब्ध करून देण्याची मागणी अभाविपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी रोहित हुमणाबादीमठ, सचिन हिरेमठ, प्रशांत शेल्लीकोळी, मनोज पाटील, प्रज्ज्वल नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
पोलिसांसोबत वादावादी
विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने अभाविपचे कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी गेले असताना शिरस्तेदार निवेदन स्वीकारण्यासाठी आले. परंतु, विद्यार्थी प्रतिनिधींनी आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांनीच निवेदन स्वीकारावे, तोवर येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे काही काळ पोलीस व विद्यार्थ्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. काही क्षणात जिल्हाधिकारी दाखल झाल्याने विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत आपण परिवहन मंडळाशी चर्चा करू, असे आश्वासन दिल्यानंतर वाद निवळला.