केरळमध्ये एकाच शाळेतील विद्यार्थ्यांना ताप, उलट्या
शाळा आठवडाभर बंद ठेवण्याचे आदेश
वायनाड : केरळमधील वायनाड जिह्यातील कलपेट्टा येथील सेंट जोसेफ हायर सेकंडरी स्कूलमधील सुमारे 100 विद्यार्थ्यांना ताप आणि उलट्यांचा त्रास झाल्याने खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या ऊग्णालयांत दाखल करण्यात आले. आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने शाळा एक आठवड्यासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर आरोग्य विभागाच्या पथकाने शाळेची तपासणी केली. शाळेच्या आवारातील पाण्याची टाकी आणि विहीर यांचे निर्जंतुकीकरण झाले नसल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे पाण्याच्या स्रोतांसह संपूर्ण परिसराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी शाळा आठवडाभर बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या काळात विहिरी, पाण्याच्या टाक्मया आणि शाळेच्या संपूर्ण परिसराची व्यवस्थित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले. या तपासणीचे नेतृत्व कलपेट्टा जनरल हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम यांनी केले. आरोग्य निरीक्षक पी. ए. नवास तसेच कनिष्ठ आरोग्य निरीक्षक सुरेश कुमार आणि बिबिन वर्गीस हेही पथकात सहभागी होते.