For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बचतीतून विद्यार्थ्यांना विमानप्रवास

06:22 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
बचतीतून विद्यार्थ्यांना विमानप्रवास
Advertisement

ही घटना कर्नाटक राज्यातील आहे. या राज्यातील कोप्पळ जिल्ह्यात बहादुरबंडी नामक एक गाव आहे. या गावातील सरकारी शाळेचे मुख्याध्यापक वीराप्पा अंदगी यांनी एक नवीनच उदाहरण घालून दिले आहे. त्यांनी त्यांच्या साठविलेल्या पैशातून निवडक विद्यार्थ्यांना विमानप्रवास घडविला आहे. सध्या या घटनेची मोठी चर्चा होत आहे. या मुख्याध्यापकांना यासाठी थोडाथोडका नव्हे, तर 5 लाख रुपये खर्च आला आहे. त्यांना जवळपास त्यांची सर्व शिल्लक यासाठी उपयोगात आणावी लागली आहे. पण आपण जे ठरविलेले होते, ते पूर्ण केल्याचा आनंद त्यांना आहे.

Advertisement

या त्यांच्या अभियानासाठी त्यांनी विद्यार्थ्यांची निवड त्यांची एक परीक्षा घेऊन केली. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत चांगली कामगिरी केली, त्यांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकाच्या आधारावर या विमानप्रवासासाठी निवडण्यात आले. या परीक्षेसाठी पाचवी ते आठवी या इयत्तांमधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. एकंदर, 28 विद्यार्थी-विद्यार्थिनी या उपक्रमासाठी पात्र ठरले होते. या साऱ्यांना या मुख्याध्यापकांनी तोरनगल्लू ते बेंगळूर असा विमानप्रवास घडविला. या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा प्रथमच विमान प्रवास होता. त्यामुळे प्रवासाआधी, प्रवासात आणि प्रवासानंतर हे विद्यार्थी अत्यंत उल्हासात होते. आपले मुख्याध्यापक, त्यांच्या साठविलेल्या पैशातून आपल्यासाठी असे काही करतील, याची कल्पनाही त्यांना करता आली नव्हती. त्यांनी या पहिल्यावहिल्या विमान प्रवासाचा आनंद मन:पूत लुटला. अनेक विद्यार्थ्यांनी नंतर त्यांचे अनुभवही कथन केले. सध्या सोशल मिडियावर हे मुख्याध्यापक आणि त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेले ही अनोखी भेट यांची बरीच चर्चा होत आहे. अनेकांनी या मुख्यध्यापकांची या उपक्रमासाठी प्रशंसा केली आहे. त्यामुळे ही शाळाही सध्या मोठ्या प्रमाणात प्रकाशात आल्याचे दिसून येते

Advertisement

Advertisement
Tags :

.