‘नो बॅग डे’ची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
पालकांतून नाराजी : सेतूबंध कार्यक्रमामुळे विलंबाचे कारण
बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांनी दप्तराचे ओझे पाठीवर न घेता शाळेला जाण्याचा एक दिवस निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी शालेय विद्यार्थ्यांनी दप्तर न घेता शाळेला जाऊन अध्ययन करण्याचा दिवस शनिवार ठरला असला तरी जून महिन्यात तिसऱ्या शनिवारी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी पाठीवर दप्तर लादून शाळेला जात असताना दिसून आले. त्यामुळे शिक्षण खात्याचा दप्तराविना शाळेला जाण्याचा नियम कागदावरच राहिला आहे की काय, असा प्रश्न पालकवर्गातून विचारला जात आहे.
जिल्ह्यात 29 मे रोजी शाळांना सुरुवात झाली. जूनच्या तिसऱ्या शनिवारी शाळेला दप्तर घेऊन जाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रत्येक महिन्याचा तिसरा शनिवार विद्यार्थ्यांना विनादप्तर शाळेत दाखल करून घेणे, त्यांना अभ्यासेतर उपक्रम शिकविणे हा शिक्षण खात्याचा उद्देश आहे. तिसरा शनिवार हा ‘नो बॅग डे’ म्हणून ओळखला जात आहे. मात्र, जूनच्या तिसऱ्या शनिवारी विद्यार्थी शाळेला दप्तर घेऊनच गेले. याबद्दल पालकांनी शिक्षकांकडे विचारणा केली असता, शाळेमध्ये सेतूबंध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तो झाल्यानंतर जुलै महिन्यापासून ‘नो बॅग डे’ नियम अमलात आणण्यात येईल, असे सांगण्यात आले.
‘नो बॅग डे’ हा विद्यार्थ्यांसाठी शाळेत दप्तर न नेण्याचा दिवस असतो. त्याचा उद्देश विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यापासून आराम देणे, त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त करणे आणि शिक्षणाची एक वेगळी बाजू अनुभवणे हा आहे. या दिवशी विद्यार्थी अभ्यासाऐवजी शाळेतील इतर उपक्रमांमध्ये भाग घेतात. जसे की खेळ, कला, संगीत, नाटक इत्यादी. त्यामुळे त्यांना शिक्षणाची एक बाजू समजते आणि शिकण्याची कला अधिक सोपी होते. विद्यार्थी इतर मुलांसोबत मिसळतात, संवाद साधतात आणि एकत्रितरित्या काम करण्यास शिकतात. त्यांचा सामाजिक आणि भावनिक विकास होतो. ‘नो बॅग डे’मुळे विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशिलता, कल्पनाशक्ती आणि कौशल्य वापरण्याची संधी मिळते. एकूणच ‘नो बॅग डे’ हा विद्यार्थ्यांसाठी एक आनंददायी व महत्त्वपूर्ण दिवस असतो. यामुळे त्यांचे शिक्षण अधिक प्रभावी आणि मनोरंजक बनत असल्याचे अनुभवास येत आहे.
दप्तरासाठी नियम
दप्तरांनी भरलेली अवजड बॅग वाहून नेणे विद्यार्थ्यांना कित्येकदा शिक्षेसारखी ठरते. केंद्रीय शिक्षण मंत्रालय स्कूल बॅग पॉलिसी-2020 प्रकारे काही नियम करण्यात आले आहेत. पहिली ते दुसरीमधील विद्यार्थ्यांना 1.6 ते 2.2 किलोपर्यंत वजनाचे दप्तर असावे, असा नियम आहे. मात्र, बहुतांशी शाळा या नियमाचे पालन करीत नसल्याचे दिसून येते.