रंगोत्सवादिवशीच परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड
बससेवेअभावी पालक परीक्षा केंद्रांवर
बेळगाव : बेळगाव शहरासह तालुक्यात मंगळवारी रंगोत्सवाचा उत्साह दिसून आला. परंतु याचदिवशी बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर असल्यामुळे रंगोत्सवाचा आनंद बाजूला ठेवत विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागले. त्यामुळे डीजेच्या तालावर रंगांची उधळण करत थिरकता न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला. शनिवार दि. 28 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. मंगळवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता. रंगोत्सव असल्यामुळे सकाळपासून बसफेऱ्या थांबविण्यात आल्या. याचा फटका परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे पालकांनाच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना घेऊन जावे लागले. कोणीही विद्यार्थ्यांवर रंग मारू नये, असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले होते. त्यामुळे रंगांची उधळण करणाऱ्यांकडून परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला.
इंग्रजी पेपरला 437 जणांची दांडी
मंगळवारी बेळगाव शहरासह शैक्षणिक जिल्ह्यातील 42 केंद्रांवर इंग्रजी विषयाचा पेपर झाला. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांचा इंग्रजी हा भाषा विषय असल्याने विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. एकूण 20,432 विद्यार्थ्यांनी या पेपरसाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 19,995 विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले. उर्वरित 437 विद्यार्थी गैरहजर राहिले.
परीक्षेनंतर रंगोत्सवाला सुरुवात...
बेळगाव शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर बारावीचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी मंडळांकडून घेण्यात आली. चव्हाट गल्ली परिसरात बारावीचे परीक्षा केंद्र असल्याने दुपारी 1 नंतर रंगोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला. काही ठिकाणी पेपर संपल्यानंतर डीजे सुरू करण्यात आल्याने मंडळांनी सामाजिक भान जपल्याबद्दल कौतुक होत आहे.