बेकिनकेरेत सुरळीत बससाठी विद्यार्थी आक्रमक
स्वतंत्र बससेवा कांही दिवसातच बंद : संतप्त विद्यार्थ्यांचा रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, प्रशासनाचा निषेध
बेळगाव : बेकिनकेरे गावासाठी सोडण्यात आलेली स्वतंत्र बससेवा काही दिवसातच बंद झाल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी रास्तारोको करून आंदोलन छेडले. उचगाव-कोवाड मार्गावर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. जवळजवळ दोन तास आंदोलन छेडून विद्यार्थ्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. गावाला स्वतंत्र बस नसल्याने अतिवाड बसवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होऊ लागले आहेत. यासाठी कित्येक वेळा परिवहनला निवेदने देण्यात आली.
दरम्यान, मागील आठवड्यात परिवहनने गावासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था केली. मात्र बससेवा सुरू होऊन चार दिवसातच बंद झाली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करून आंदोलन छेडले. नुकतीच सुरू करण्यात आलेली स्वतंत्र बस जोपर्यंत सुरू केली जाणार नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी घेतला. बससाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने आंदोलनस्थळी काकती पोलीस स्थानकाचे सीपीआय आणि सहकारी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी परिवहनला कळवून बससेवा सुरळीत करण्याचे आवाहन केल्यानंतर आंदोलन तात्पुरत्या कालावधीसाठी मागे घेण्यात आले. दरम्यान बससेवा पूर्ववत सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर वसलेल्या बेकिनकेरे गावाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. बससेवा मिळत नसल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे हाल होऊ लागले आहेत. सायंकाळी 6 नंतर गावाला बससेवा नसल्याने उशिराने प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसमध्ये विद्यार्थ्यांचा पास उपयोगी पडत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कर्नाटक परिवहनच्या बसनेच प्रवास करावा लागतो. मात्र या मार्गावर बसेस नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. भर पावसात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनस्थळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सीमाहद्दीतील उचगाव-कोवाड मार्गावर काहीकाळ वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. याप्रसंगी कामगार संघटनेचे सुनील गावडे, ग्राम पंचायत सदस्या गंगुबाई गावडे, लक्ष्मी सावंत, गुंडू धायगोंडे, पिंटू सुतार यासह ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
गावातून दररोज शेकडो विद्यार्थी शाळा, महाविद्यालय शिक्षणासाठी बेळगावला येतात. मात्र गावासाठी सुरळीत बससेवा नसल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांची गैरसोय होऊ लागली आहे. विशेषत: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गावाला बससेवाच नसल्याने विद्यार्थ्यांना रात्री 9 वाजता घरी पोहोचत आहेत. यामध्ये विद्यार्थिनींची मोठी कुचंबना होऊ लागली आहे. शिवाय विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे, अशा संतप्त प्रतिक्रियाही आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.