खिडकीच्या सीटसाठी झालेल्या भांडणातून विद्यार्थ्यावर चाकू हल्ला
मार्केट पोलिसात गुन्हा दाखल
बेळगाव : बसमध्ये प्रवास करताना खिडकीच्या सीटसाठी झालेल्या भांडणाचे पर्यवसान एका विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करण्यात झाले आहे. बुधवारी सकाळी सीबीटी परिसरात ही घटना घडली असून मार्केट पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल झाला आहे. माज अब्दुलरशीद सनदी (वय 19) राहणार चावडी गल्ली, पंतबाळेकुंद्री असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बीएच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. या घटनेनंतर सुरुवातीला त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे.
माजच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन या घटनेसंबंधी माहिती घेतली. केए 42 एफ 0495 क्रमांकाच्या बसमधून कॉलेजला जाण्यासाठी माज बेळगावला येत होता. खिडकीच्या सीटसाठी दुसऱ्या तरुणाबरोबर भांडण झाले. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास बस सीबीटीवर पोहोचली. त्यावेळी माजवर चाकू हल्ला झाला आहे. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.