अफवेमुळे पंजाबमधील ‘एलपीयू’मध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक
परिसरात रात्रभर तोडफोड-जाळपोळ : महामार्गावर ठिय्या : वाहतूक विस्कळीत
पंजाबमधील लव्हली प्रोफेशेनल युनिव्हर्सिटी (एलपीयू) परिसरात एका अफवेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप उसळल्याची घटना घडली. संतप्त विद्यार्थ्यांनी परिसरात आंदोलन करत काही ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ केल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासन आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. गर्ल्स हॉस्टेलशी निगडित एका गंभीर प्रकरणावरून विद्यार्थिनींमध्ये संताप वाढला असताना सोशल मीडियावर एका विद्यार्थिनीवर बलात्कार आणि त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा दावा झाला. तर विद्यापीठाने वातावरण बिघडविण्याचा हा कट असल्याचा आरोप केला आहे.
वृत्तसंस्था, जालंधर
सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये या प्रकरणी एका कर्मचाऱ्यावरही आरोप करण्यात आले होते. 3-4 दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. विद्यार्थिनीच्या पालकांच्या तक्रारीच्या आधारावर संबंधित प्रकरणी तपास केला जात आहे. तर याच विद्यार्थिनीच्या प्रकरणी बलात्काराचा दावा करण्यात येत आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. विद्यार्थिनीच्या मृतदेहावरील उत्तरीय तपासणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही असे कपूरथळाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.
संबंधित घटनेच्या अफवेनंतर मोठ्या संख्येत विद्यार्थी विद्यापीठ परिसरात एकवटले. अफवा पसरल्यावर वातावरण तणावपूर्ण झाले आणि विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांना घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे.
महामार्गावर वाहतूक ठप्प
आंदोलनाचा परिणाम परिसराबाहेरील वाहतुकीवरही झाला. विद्यार्थ्यांनी महामार्गावर ठिय्या दिल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. पोलिसांनी विद्यार्थ्यांना रस्त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला.
प्रशासनाकडून प्रयत्न
घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलिसांनीही परिसरात बंदोबस्त वाढविला. विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. नुकसान आणि घटनेच्या पार्श्वभूमीवर पुढील कारवाईबाबत प्रशासनाकडून माहिती मिळविली जात आहे.
सोशल मीडियामुळे वाढला तणाव
घटनेशी संबंधित विविध संदेश आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने परिस्थितीबाबत संभ्रम निर्माण झाला. मात्र, सोशल मीडियावरील प्रत्येक दावा सत्य मानणे योग्य नसून अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यापीठाचे काय सांगणे?
सोशल मीडियाद्वारे फैलावणाऱ्या अफवा या निराधार आहेत. काही असामाजिक घटक सोशल मीडिया अन् इतर माध्यमांद्वारे पूर्णपणे खोट्या अफवा पसरवत असल्याचे लक्षात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांदरम्यान अनावश्यक भ्रम निर्माण होतोय. विद्यापीठाच्या शांततापूर्ण शैक्षणिक वातावरणाला बिघडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा विद्यापीठाच्या रजिस्ट्रार डॉ. मोनिका गुलाटी यांनी केला आहे.
अफवा नेमकी काय?
घटनेमागील कारण म्हणून एका अफवेचा उल्लेख केला जात असला तरी अफवेचा नेमका स्रोत आणि त्यातील तथ्य याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणे बाकी आहे. सोशल मीडिया आणि विद्यार्थ्यांमध्ये पसरलेल्या संदेशांमुळे परिस्थिती अधिकच चिघळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अधिकृत माहितीशिवाय कोणत्याही दाव्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.