राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी श्रेयस पानोळकरची निवड
माडखोल -धवडकी शाळेचा विद्यार्थी; बेंगलोर येथील प्रदर्शनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव शाळा
ओटवणे | प्रतिनिधी
माडखोल- धवडकी शाळा नं. २ या शाळेचा विद्यार्थी कु. श्रेयस वसंत पानोळकर याने सादर केलेल्या 'प्रदुषणमुक्त सुरक्षित महामार्ग' या विज्ञान प्रकल्पाची बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातून अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. बेंगलोर येथील अगस्त्य इंटरनॅशलनल फाऊंडेशनच्या मुंबई उपशाखा यांच्यावतीने आयोजित केलेल्या या 'राष्ट्रीय जिज्ञासा विज्ञान प्रदर्शन - २०२३' मधे महाराष्ट्र राज्यातून श्रेयस पानोळकर याच्या विज्ञान प्रकल्पाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या प्रदर्शनात निवड झालेली धवडकी प्राथमिक शाळा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. या निवडीमुळे या शाळेने उत्तुंग विज्ञान भरारी घेतली आहे.
येत्या १ व २ डिसेंबरला बैंगलोर वरून या प्रकल्पाचे ऑनलाईन सादरीकरण व मूल्यमापन होणार आहे. श्रेयसला विज्ञान शिक्षक अरविंद सरनोबत यांचे मार्गदर्शन लाभले. श्रेयसच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या