वायनाडमध्ये विद्यार्थ्याची हत्या, एसएफआय सदस्यांचा हात
पशूचिकित्सा महाविद्यालयात प्रकार : पोलिसांकडून 6 जणांना अटक
वृत्तसंस्था/ वायनाड
केरळच्या एका शासकीय पशूचिकित्सा आणि पशूविज्ञान विद्यापीठात एका विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. तर 7 व्या आरोपीला पलक्कड येथून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. राज्यातील सत्तारुढ माकपची विद्यार्थी शाखा एसएफआयने या विद्यार्थ्याची हत्या केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असलेल्या 20 वर्षीय सिद्धार्थनचा मृतदेह 18 फेब्रुवारी रोजी वसतिगृहात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी वसतिगृहात सिद्धार्थनला तीन दिवसांपर्यंत मारहाण केली होती. तर उत्तरीय तपासणी अहवालानुसार सिद्धार्थच्या मृतदेहावर अनेक प्रकारच्या खुणा होत्या. त्याचे रॅगिंग करण्यात आले होते असे समोर आले आहे. याप्रकरणातील आरोपी हे एसएफआय कार्यकर्ते आहेत. या आरोपींनी विद्यार्थ्याला मारहाण करत ठार केले आहे. आरोपींना सत्तारुढ पक्षाचे संरक्षण मिळत असल्याचा दावा काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन यांनी केला आहे.
तर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राज्य पोलीस प्रमुखांना विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्देश दिला आहे. तसेच आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.