For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यार्थ्याने ‘रचला’ इतिहास...

06:05 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
विद्यार्थ्याने ‘रचला’ इतिहास
Advertisement

इतिहास हा विषय नावडता असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. इतर विषयांमध्ये, अगदी गणितासारख्या अवघड मानल्या जाणाऱ्या विषयांमध्ये चांगले गुण मिळविणारे विद्यार्थ्यी कित्येकदा इतिहास या विषयात कच्चे असतात. कित्येक विद्यार्थ्यांचे तर ‘अभ्यास’ या विषयाशीच वाकडे असते. त्यामुळे अजिबात अभ्यास न करता परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी नसते. असे विद्यार्थी प्रश्नपत्रिका हाती आली की अशी काही उत्तरे लिहितात की आश्चर्य वाटते. अलिकडच्या काळात अशी उत्तरे ‘उधळलेल्या’ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सोशल मिडियावर प्रसिद्ध होतात. त्या वाचून मनोरंजन झाल्याशिवाय रहात नाही.

Advertisement

सध्या सोशल मिडियावर अशीच एक उत्तरपत्रिका पोस्ट झाली आहे. अनेकांनी ती पाहून बऱ्याच टिप्पणी केल्या आहेत. ही उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या विद्यार्थ्याने ‘झेलम युद्धाचे’ वर्णन त्याच्या खास शैलीत केले आहे. झेलमच्या युद्धाचे वर्णन 300 शब्दांमध्ये लिहा, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या विद्यार्थ्याने या युद्धाचे त्याच्या कल्पनेनील वर्णन लिहिले. ही कल्पना देखील त्याने तीन-चार शब्दांमध्येच  व्यक्त केलेले दिसून येते. या युद्धाचे वर्णन लिहिताना त्याने प्रथम सिकंदराचा घोडा कसा दौडत आला याचे वर्णन ‘तबडक, तबडक, तबडक’ हा शब्द अनेकवेळा लिहून केले आहे. त्यानंतर ‘धांय धांय’ असा शब्द पन्नास-साठवेळा लिहिला आहे. नंतर पुन्हा ‘सॉरी’ असे लिहून धांय धांय नाही, सांय सांय असे आणखी पन्नास वेळा लिहिल्याचे दिसून येते. त्यानंतर ‘पोरसने भी तीर चलाये’ असे लिहून शेवटी ‘वो सिकंदरही कहलाता है, हारी हुवी बाजी जीतना जिसे आता है’ अशा हिंदी चित्रपटातील ‘डायलॉग’ शोभावा, अशा पद्धतीने उत्तराचा शेवट केला आहे.

अर्थातच, हा विद्यार्थी काही ‘हारी हुवी बाजी’ या परीक्षेच्या इतिहासाच्या उत्तरपत्रिकेत जिंकू शकला नाही, हे उघड आहे. त्याला या विषयात 80 पैकी 7 गुण मिळालेले दिसून येतात. या गुणांशिवाय ही प्रश्नपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांवर शेलक्या शब्दांमध्ये काही टिप्पणी उत्तरप्रत्रिकेत लिहिलेली दिसून येते. या उत्तरपत्रिकेचा व्हिडीओ एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेकांनी मजेशीर कॉमेंटस् पोस्ट केल्या आहेत. ‘या विद्यार्थ्याचे भवितव्य उज्ज्वल आहे. तो पुढे मोठा राजकीय नेता होईल,’ अशी टिप्पणी एका दर्शकाने केली आहे. ‘या विद्यार्थ्याने युद्धाचे वर्णन करताना चुकीचे काय लिहिले आहे ? योग्य तेच तर लिहिले आहे,’ अशीही खोचक टिप्पणी एका दर्शकाने केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.