एसटीटी करवाढीने शेअर बाजारात हाहाकार
सेन्सेक्स 1546, निफ्टी 495 अंकांनी घसरला
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय शेअर बाजारासाठी रविवारचे अर्थसंकल्पादिवशीचे सत्र मोठी पडझड घेऊन आला. शेअरबाजारातील फ्युचर अँड ऑप्शन व्यवहारावर एसटीटी करात वाढ करण्याच्या प्रस्तावाचा उल्लेख केल्याच्या निराशेतून बाजाराने मोठी घसरण नेंदवली. सेन्सेक्स तब्बल 1546 अंकांनी धडाम झाला तर सोबत राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टीही 495 अंकांनी कोसळला. दरम्यान व्यापारी, गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी रुपये बुडाले.
फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग व्यवहारावर एसटीटी (सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स) कर वाढवण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर शेअरबाजारात एकदम मोठी घसरण दिसून आली. फ्युचर व ऑप्शन ट्रेडिंगवर एसटीटी कर 0.02 टक्केवरुन 0.05 टक्के इतका वाढवण्यात आला. सुरुवातीला बजेटसादरीकरणाआधी सेन्सेक्स व निफ्टी तेजीसमवेत खुले झाले होते. पण अर्थमंत्र्यांनी शेअर बाजारासाठी धक्का देणारी कर वाढीची घोषणा केल्यानंतर बाजार एकदम एकाकी कोसळला. फ्युचर व ऑप्शन ट्रेडिंगवर एसटीटी कर वाढवण्यात आल्याच्या घोषणेनंतर शेअरबाजारात दुपारी एकावेळी 1800 अंकांनी सेन्सेक्स तर निफ्टी 300 अंकांनी घसरला होता. विक्रमी कर्जाच्या बातमीचा परिणामही पीएसयु बँकांच्या समभागांवर नकारात्मक दिसला. सरकारी बँकांचा निर्देशांक 5.57 टक्के घसरणीसोबत बंद झाला. मेटल निर्देशांकही 4 टक्के घसरला. आयटी वगळता सर्व निर्देशांक घसरणीत होते.