एसटीच्या ‘युपीआय पेमेंट’ उत्पन्नात दुपटीने वाढ
कोल्हापूर :
एसटीचे तिकीट दरात वाढ झाली असून नवीन तिकीट दर विषम आहेत. परिणामी सुट्ट्या पैशावरून प्रवाशी आणि कंडक्टरमध्ये वादाचे प्रकार होत आहेत. यामुळे एसटी प्रशासनाने यावर पर्याय म्हणून युपीआय पेमेंटचा वापर वाढविण्याचे आवाहन प्रवाशांना केले होते. यास प्रतिसाद मिळत असून एसटीचे तिकीट दर वाढ झाल्यापासून युपीआय पेमेंटमधील उत्पन्नात दुपट्टीने वाढ झाली आहे.
एसटी प्रशासनाने आठ दिवसांपूर्वी तिकीट दरात वाढ केली आहे. सुमारे 15 टक्के दरवाढ केली आहे. यामध्ये तिकाटीची रक्कम 81, 303, 433, 46 102 अशी विषम झाली आहे. यामुळे सुट्टे देण्यावरून प्रवाशी आणि कंडक्टर यांच्यामध्ये वादाचे प्रसंगही पाहण्यास मिळत आहेत. प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन त्यांनी केलेल्या सूचनेनुसार सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांच्यामध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीने प्रवाशांना युपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून युपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे.
एस.टी. महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन दिले आहेत. या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढले जाते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या युपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील. अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार महामंळाने युपीआय पेमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांमध्ये युपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून परिणामी मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये युपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. तिकीट दर वाढीपूर्वी एसटीचे राज्यातून रोज 87 लाख रूपयांचे उत्पन्न युपीआयमधून मिळाले आहेत. तिकीट दर वाढीनंतर रोज 1 कोटी 25 लाख 80 हजार इतके उत्पन्न केवळ युपीआय सिस्टीमच्या माध्यमातून एसटीचे तिजोरीत जमा झाले.
- कंडक्टरांना रोज 100 रुपये सुट्टे देण्याचे आदेश
एसटी महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रकमेमध्ये 100 रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याचा आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरुन होणाऱ्या वादावर पडदा पडणार असल्याचा दावा एसटी प्रशासन करत आहे.
- दर वाढण्यापूर्वी युपीआय पेमेंट
दिनांक युपीआय उत्पन्न
21 जानेवारी 2025 87,58,060
22 जानेवारी 2025 86,50,905
23 जानेवारी 2025 84,23,025
24 जानेवारी 2025 67,36,018
- तिकीट दर वाढीनंतर युपीआय उत्पन्न
दिनांक युपीआय उत्पन्न
26 जानेवारी 2025 1,53,05,864
27 जानेवारी 2025 1,46,04,272
28 जानेवारी 2025 1,25,18,083
29 जानेवारी 2025 1,19,82,841
30 जानेवारी 2025 1,25,80,871