परिस्थितीशी झुंजतानाच घर झाले खाक
केअरटेकर संदेश च्यारी कुटुंबीय झाले बेघर ;दस्तावेज, दागिन्यांसह 20 लाखांची हानी
प्रतिनिधी/ फेंड़ा
गाळवाडा-प्रियोळ येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून पूर्ण कौलारू घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या दुर्घटनेत सुमारे 20 लाख रूपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे. घरात वास्तव्यास असलेल्या केअरटेकर संदेश च्यारी यांची महत्वाचे कागदपत्रे, दागिन्यांसह, घरातील मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. ही घटना गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.
कुंडई अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार गाळवाडा प्रियोळ येथील दामोदर नाईक यांचे हे घर असून या घरात संदेश च्यारी आणि गीता च्यारी हे दांपत्य केअरटेकर म्हणून आपल्या दोन मुलांसमवेत राहतात.
गुऊवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली त्यावेळी घरात कुणीच नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. आग किचनपर्यंत पोचल्यानंतर गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ कुंडई अग्निशामक दलाला पाचारण केले. घर टेकडीवर असल्याने प्रथम अग्निशामक दलाला घटनास्थळावर पोचण्यापूर्वी परिश्रम करावे लागले. अग्निशामक दल पोचण्यापूर्वी ग्रामस्थानी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने घर आगीत जळून खाक झाले. अग्निशामक दलाने सुमारे 20 लाख रूपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याची माहिती दिली आहे.
संदेश च्यारी यांच्या मुलाच्या आजारपणामुळे ते रात्रीच्या वेळी झोपायला मंगेशी येथे आपल्या नातेवाईकांकडे जात असे. मार्गशीष महिन्याची गुरूवारची पूजापाठचा कार्यक्रम उरकून हे दांपत्य रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मंगेशी येथे राहायला गेले होते. त्यानंतर मध्यरात्री ही दुर्घटना घडली.
आगीत मुलांच्या शैक्षणिक गुणपत्रिका व इतर महत्वाची कागदपत्रेही जळून खाक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संदेश च्यारी काही दिवसांपूर्वीच एका कंपनीतून निवृत्त झाले आहेत. पत्नी गृहिणी असून मुलांचे आजारपण व आता या दुर्घटनेमुळे च्यारी कुटुंबीय पूर्णत: खचले आहे. कठिण परिस्थितीत झुंजत असलेल्या केअरटेकर दाम्पत्याचा निवारा आगीत भस्मसात झाल्याने त्यांच्यावर बाका प्रसंग उद्भवला आहे. स्थानिक पंचायतीने या घटनेचा पंचनामा केला असून, निवारा पुन्हा उभारण्यासाठी सरकारी दरबारी मदतीचे आवाहन च्यारी यांनी केले आहे.