वक्फ बोर्डसाठी चुरशीने मतदान
347 मतदारांपैकी 344 जणांनी बजावला हक्क
बेळगाव : बेळगाव विभागातील वक्फ बोर्डच्या दोन जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. येथील प्रादेशिक आयुक्त कार्यालयात बेळगाव, विजापूर, बागलकोटसह सात जिल्ह्यांतील मतदारांनी आपला हक्क बजावला. केवळ तिघेजण मतदानासाठी आले नाहीत. मतदार यादीतील उर्वरित सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला. मुत्तवल्ली विभागाच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहा जण रिंगणात आहेत. बेळगाव विभागातील सात जिल्ह्यांत एकूण 347 मतदार आहेत. यापैकी 344 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतपेट्या मंगळवारी सायंकाळी बेंगळूरल्या रवाना झाल्या असून 21 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. प्रादेशिक आयुक्त कार्यालयात मतदानाची प्रक्रिया पार पडली. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रांताधिकारी श्रवण नायक आदींनी मतदान केंद्राला भेट दिली. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या वक्फ बोर्ड विरोधात संपूर्ण राज्यात वादंग माजला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्ड दावा करतोय, या विरोधात भाजपने आंदोलन छेडले आहे. संपूर्ण राज्यात वादंग सुरू असतानाच वक्फ बोर्डसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.